चौथी पर्यंत हिंदी

मला यत्ता चौथी पर्यंत हिंदी यायचं नाही..

शाळेत विषयच नव्हता..

यायचं नाही म्हणजे नाही…अजाबात नाय…

म्हणून जे काही दिसेल ते मराठीतच समजून घ्यायचं..

मुकद्दर का सिकंदर हा सिनेमा..

आम्ही चाळकरी पोरं “मुकंदर का सिकंदर” असं म्हणायचो..

आणि त्याचा अर्थ आमच्या दृष्टीनं लिटरली मराठी होता: “मुकंदर ? …का सिकंदर?” म्हणजे “चहा की कॉफी?” ..
“मुकंदर ऑर सिकंदर ?”.. मेक युअर चॉईस…

कुर्बानी “पिच्चर” मध्ये आप जैसा कोई हे मस्त डिस्को गाणं आलं..

मूळ अर्थ कळत नसल्यानं जे ऐकू येईल ते खरं..

“आप जैसा कोई मेरी जिंदगी में आये..तो बाप बन जाये..”

सीरीयसली असंच वाटायचं..जोक करायचा म्हणून नव्हे..

मग थोड्या दिवसांनी..

“आप जैसा कोई मेरी जिंदगी में आये..तो वापस जाये..”

असं…

“तोहफा तोहफा..लाया लाया..”असं गाणं सुपरहिट्ट एकदम..

मला त्यात (शिवाजी महाराजांची असते तशी) “तोफ” हा शब्द दिसून मनापासून कोणीतरी युद्धासाठी तोफा घेऊन आलाय आणि तसं गाऊन श्रीदेवीला सांगतोय असं वाटायचं..

“तोफा तोफा लाया लाया..” काय चूक आहे त्यात?

पाण्याच्या टाकी विषयी माहिती देणारं “टाकी ओ टाकी ओ टाकी टाकी टाकी रे..” असंही एक सुंदर गीत होतं..

“प्यार करनेवाले प्यार करते है ‘शाम’ से..” असंही ढिंगचॅक गाणं माझं लाडकं..

‘शान’से हे नंतर कळलं..

पण संध्याकाळपासूनच चौपाटीवर जागा पकडून बसलेली गुटर्गू मंडळी बघून हा माझा अजाण वयातला अर्थही आता बरोबरच वाटतो..

माझा चाळीतला चाळूसोबती मला सिनेमाची स्टोरी सांगत होता..

“….अरे तो प्रेम चोप्रा ना मीनाक्षी शेशाद्रीवर बलात्कार करतो..”

“म्हणजे काय करतो नक्की ?” मी ज्ञानलालासेनं विचारता झालो..

तो थोडा विचारात पडला..

मग …”अरे बलात्कार..म्हणजे हिकडे तिकडे हातबीत लावून सतावतो तिला तो..”

हलकेच मला समजावत तो वदला..

दोघेही तिसरीत होतो..असो..

मराठी, संस्कृत वगैरे मध्येही ऐकून अर्थ लावण्याची बोंबच होती..

“सा विद्या या विमुक्तये” हे शाळेचं बोधवाक्य मला “चावी द्याया विमुक्तये” असं ऐकू यायचं..

अर्थ नाहीच कळायचा..पण चावी किंवा किल्लीशी संबंधित..चावी द्यायला हवी आहे..किंवा तत्सम काहीतरी वाटायचं..

“सदाचार हा थोर सांडू नये तो” हे मला “सदाचार हा थोर सांडून येतो” असं ऐकू यायचं..म्हणजे “मी जरा जाऊन सदाचार सांडतो आणि येतोच परत लगेच..”

”आज ये अंगणा पाहुणा गोजिरा..” अशी कविता होती..

त्यात “श्रावणी न्हातसे..अश्विनी गातसे..” अशी ओळ होती..

मला आमच्या वर्गातल्या त्याच नावाच्या मुली अनुक्रमे नहात आणि गाणं गात आहेत असं डोळ्यासमोर यायचं..

“आली आली सर ही ओली..” हे गाणं ऐकलं की धुवांधार पावसात भिजून ओले झालेले साळवी सर (सर्वात कडक्क सर..!!) वर्गाच्या दारात आलेत असं वाटायचं..

गंजका खिळा,पत्रा वगैरे लागला की धनुर्वात होतो असं ऐकलेलं..आम्ही एकमेकांना सांगायचो..”अरे पत्रा लागलाय ना तुला..आता तुला धनुर्विद्या होणार”.. की बिचारा कापलेला पोरगा गळफटायाचा..

नगरपालिकेच्या व्यायामशाळेत दर शनिवारी शेंदूर लावून आम्ही सगळे हनुमान स्तोत्र म्हणायचो..

तालीम मास्तर खड्या आवाजात “भीमरूपी महारुद्रा” सुरु करायचे..

खोब-याच्या आशेनं आम्ही उभे असायचो..

त्यात एका ठिकाणी “हे धरा पंधरा श्लोकी लाभली शोभली बरी..” अशी ओळ यायची..

मला एकदम वाटायचं की श्लोक संपले आणि मास्तर काहीतरी “हे धर” म्हणून सांगताहेत..म्हणून एकदा मी “धरायला” पुढेही झालो होतो..

पुढे हायस्कूल सुरु झालं..बरंच काही नीट समजायला लागलं..जमिनीवर टाकून बसायची बस्करं गेली आणि लाकडी बेंच आली..

मग चुपचाप समोरच्या डेस्कात कर्कटकानं खोदखोदून आरपार भोकं पाडण्याची वर्षं सुरु झाली..

मज्जा..!!

लेखक : नचिकेत गद्रे

कुठेतरी छानसे वाचलेले ………

Advertisements

प्रेमाची निशाणी ???

जरूर वाचा….

आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे कि ताजमहाल प्रेमाची निशाणी म्हणून ओळखला जातो…….
पण काही इतर गोष्टी जे फार कमी लोक जाणतात त्या ह्या अश्या————
१) मुमताज हि शहाजहानची ४ थी बायको होती.

२) मुमताजशी लग्न करता याव म्हणून शहाजहानने तिच्या नवऱ्याचा खून केला.

३) मुमताज तिच्या १४ व्या बाळंतपनात मेली.

४) त्या नंतर शहाजहानने तिच्या बहिणीशी लग्न केल.
.
.
.
अरे मला सांगा यात काय घंटा प्रेम आल ??????????????

कुठेतरी छानसे वाचलेले ………

Advertisements

संस्कृती

शेवटी संस्कृती म्हणजे बाजरीची भाकरी…

वांग्याचे भरीत..

गणपतीबाप्पा मोरया ची मुक्त आरोळी.

केळीच्या पानातली भाताची मूद आणी त्यावारचे वरण.

उघड्या पायांनी तुडवलेला पंचगंगेचा काठ…

मारूतीच्या देवळात एका दमात फोडलेल्या नारळातली उडालेले पाणी…
दुस-याचा पाय चूकुन लागल्यावर देखील आपण प्रथम केलेला नमस्कार..

दिव्या दिव्यादिपत्कार…

आजीने सांगितलेल्या भुतांच्या गोष्टी…

मारुतीची न जळणारी आणि वाटेल तेव्हा लहानमोठी होणारी शेपटी…

दस-याला वाटायची आपट्याची पाने…

पंढरपुरचे धुळ आणि अबिर यांच्या समप्रमाणात मिसळून खाल्लेले डाळे आणि साखरफुटाणे…

सिंहगडावर भरुन आलेली छाती आणी दिवंगत आप्त्यांच्या मुठभर अस्थींचा गंगार्पणाच्या वेळी झालेला स्पर्श…
कुंभाराच्या चाकावर फिरणा-या गोळ्याला त्याचे पाण्याने भिजलेले नाजुक हात लागून घाटादार मडके घडावे तसा ह्या अद्र्श्य पण भावनेने भिजलेल्या हांतानी हा पिंड घडत असतो.

कुणाला देशी मडक्याचा आकार येतो.

कुणाला विदेशी कपबशीचा….

पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे……

कुठेतरी छानसे वाचलेले ………

Advertisements

क्षणभंगुर

१० :१५ ची CST लोकल
ट्रेन सुटली ..धावता धावताच तो चढला .. धावत पळत.. कसा बसा गर्दीतून तो आत शिरला.. आत मध्ये येताच क्षणी त्याची नजर पुढच्या दरवाज्या जवळ… तो पूर्णपणे कावरा बावरा.. बहुतेक त्याची नजर तिलाच शोधात असावी.. बराच वेळ..त्याने पाहिलं .. पुढच्या दोन्ही दरवाज्यांजवळ येऊन पाहिलं.. त्याच्या नजरेत..एक भीती.. एक हुरहूर.. तिच्याबद्दलची काळजी.. दिसत होती.. त्याने गर्दीतून शेवटी वाट काढत पुढच्या दरवाज्याजवळ येऊन परत खात्री केली.. रुमाल काढून घाम पुसला..लगेच काहीतरी आठवल्यासारख त्याने ..आपला मोबाईल फोन बाहेर काढला.. मोबाईल मध्ये नंबर शोधून..लगेच फोन केला.. नुसताच हेलो हेलो ऐकू आलं ..तिकडून काहीच आवाज येत नसावा.. त्याने पुन्हा प्रयत्न केला.. पण मात्र नाईलाज.. शेवटी त्याने.. शांत राहण्याचा निर्णय घेतला..! पण..शांत राहून सुद्धा..तो इकडे तिकडे पाहत होता..कि ती कुठे बसली तर नाहीये ना..!

खर तर.. त्याची ही रोजची सवय झाली होती.. रोज स्टेशन वर त्याने तिची वाट पाहणे.. तिचे ट्रेन मध्ये चढणे..त्याचे तिला पाहणे.. रोजचा एकत्र ट्रेन मधला प्रवास..! गर्दीतून… त्याने तिला दिलेलं स्मितहास्य..अन त्यावर..तिने ही दिलेला प्रतिसाद.. असं दोघांच ..प्रेम वाढत गेलं.. प्रेमाच्या बंधनात दोघे अडकले.. जसा रोजचा प्रवास तसा आयुष्याचा प्रवास सुद्धा एकत्र करण्याचं त्यांनी ठरवलं .. पण नियतीला ते मान्य नव्हतं..घडू नये तसचं घडलं..

एके दिवशी अचानक….ट्रेन मध्ये आरडा ओरडा…. बायकांच्या किंकाळ्या.. माणसांची गडबड.. ट्रेन थांबवण्यासाठीची लोकांची धडपड.. सारे वातावरण भयानक.. “कोणी चैन खेचा चैन खेचा..मुलगी पडली ” अश्या हाका. ट्रेन मधले लोकं उठून बाहेर पाहायला लागले.. ट्रेन थांबली.. पण … ट्रेन थांबण्या आधीच ..सार संपलं होतं… तीच मुलगी ट्रेन मध्ये चढताना.. पाय घसरून पडली होती.. तिचे शरीर ट्रेन आणि प्लाटफोर्म मधल्या अंतरात अडकलं होतं.. काही समजण्याच्या आधीच.. तीच आयुष्य संपलं होतं.. त्याच्या नजरे समोर ती त्याला कायमची सोडून गेली होती.. सार निःश्ब्ध.. हृदयाचे ठोके चुकले…या परिस्थितीत काय करावं..त्याला काहीच कळत नव्हतं.. जमलेल्या लोकांनी आणि पोलिसांनी.. राहिलेल्या गोष्टींची जबाबदारी घेतली..पण त्याचं मन आतून पूर्णपणे ढासाळून गेलं होतं…नुसतं स्तब्ध होऊन तो तिच्या कडे पाहत राहिला …. मगाशीच आल्या आल्या तिने मारलेल्या गप्पा.. त्यांनी एकत्र घालवलेले सारे क्षण आठवायला लागले… आपलं माणूस आपल्याला कायमचं सोडून गेल्यावर त्याची झालेली दयनीय अवस्था पाहून.. डोळ्यात आसवांनी आपोआप वाट धरली होती… आयुष्य हे किती क्षणभंगुर असतं.. ह्याचा अनुभव फार जवळून त्याला जाणवला.. त्याच जागी तो ..एकटाच रडत बसला. .

आज पण तो रोज तिची वाट पाहतो.. तिकडेच.. त्याचं जागी.. १०:१५ ची CST पकडतो.. लोकल मध्ये चढल्यावर…असाच काहीसा तिला तो रोज शोधत राहतो..अन…नंतर परत.. सार आठवून . भरगच्च डोळ्यांनी निस्तब्ध अश्रू गाळत शांत बसतो..

आयुष्य हे क्षणभंगुर आहे.. आपल्या वर प्रेम करणारे आपली काळजी करणारे बरेच लोकं असतात.. आपण नसण्याने त्यांच्या आयुष्यात काय घडू शकत याचा विचार करा.. घाई.. ऑफीस… सगळ्यांच्याच नशिबी असतं..पण जीवन हे अमूल्य असतं.. ह्याचा विचार करा..अन आजपासून..जपून प्रवास करा..

कुठेतरी छानसे वाचलेले ………

Advertisements

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठे

👉 _*महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठे…*_
_*Navratri Special*_
नवरात्रोत्सवाला अतिशय उत्साहात प्रारंभ झालाय आणि नवरात्र म्हणजे शक्ती उपासनेचे पर्व. प्राचीन काळापासून शक्तीच्या उपासनेला खूप महत्त्व दिले गेले आहे. कारण शक्तीची उपासना माणसाला नेहमीच प्रेरणादायी ठरते. महाराष्ट्रात देवीची साडेतीन शक्ती पीठे आहेत. तुळजापूरची भवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरची रेणुका ही तीन पूर्ण तर वणीची सप्तशृंगी हे अर्धे शक्तिपीठ मानले जाते. चला तर आज त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…
👉 _*पहिले शक्तीपीठ- अंबादेवी माता (कोल्हापूर)*_ : महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपिठांपैकी पहिले पीठ कोल्हापूर हे आहे. येथे श्री महालक्ष्मी-देवी चा सदैव वास असतो. हे देवालय कोणी बांधले याबाबतचे संशोधन परिपूर्ण नाही. हे देवालय शिलाहारापूर्वी करहारक (कर्‍हाड) येथील सिंदवंशी राजाने बांधले असावे असे काही संशोधक म्हणतात. देवळाच्या मुख्य वास्तुचे मुख्य दोन मजले आहेत. त्यांची बांधणी कोल्हापूरच्या आजुबाजुला मिळणार्‍या काळ्या दगडात केलेली आहे. देऊळ पश्‍चिमाभिमुख असून प्रवेशद्वारावर नगरखाना आहे.

अंबाबाईची मूर्ती 1.22 मीटर उंच असून ती एका 0.91 मीटर उंच असलेल्या दगडी चौथर्‍यावर उभी करण्यात आलेली आहे. कार्तिक आणि माघ महिन्यात अंबाबाईच्या देवळाच्याबाबत एक अतिशय विलक्षण घटना अनुभवास येते. विशिष्ट दिवशी सूर्यकिरणे महाद्वारातून प्रवेश करून गाभार्‍यापर्यंत पोहोचतात आणि तेथून ती अंबाबाईच्या प्रतिमेवर परावर्तित होतात. ही किरणे पहिल्या प्रथम अंबाबाईच्या पायावर पोहोचतात व तेथून ती हळूहळू मस्तकापर्यंत पोहोचतात. हा चमत्कार सोहळा पाच मिनिटांपर्यंत चालतो. हा सोहळा पाहण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. देवळाची बांधणीच अशा पद्धतीने करण्यात आलेली आहे की, वर्षातून केवळ दोन दिवशीच सूर्यकिरणे देवीच्या अंगावर पडतात.
एका कथेनुसार करवीर क्षेत्रातील कोल्हासुर नावाचा दैत्यराजा प्रजेला आणि देवांना पुष्कळ त्रास देत असे. अंबाबाईने त्याचा वध केला. कोल्हासुराच्या अंतिम समयीच्या विनंतीनुसार या क्षेत्राचे नाव ‘कोल्हापूर’ आणि याच ठिकाणी वास्तव्य करण्याचे अंबाबाईने मान्य केले.
👉 _*दुसरे पीठ – श्री रेणुकामाता (माहूरगड)*_ : देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मूळ जागृत पीठ म्हणजे, माहूरची श्री रेणुकामाता होय. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात माहूरगडासमोर हे ठिकाण आहे. रेणुकादेवीचे फक्त शिर दिसते, धड नाही. रेणुका ही जमदग्नी ऋषींची पत्नी व महापराक्रमी परशुरामाची आई. देवीचे मंदिर 13 व्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधले आहे असे म्हटले जाते. 
रेणुकेचे मंदिर लहानसे असून प्रवेशाचा दरवाजा दक्षिणाभिमुख आहे. दरवाजावर नगारखाना आहे. देवीला खलबत्त्यात पान कुटून नैवेद्य दाखवितात. नवरात्रीत येथे नऊ दिवस मोठ्या प्रमाणात धार्मिक उत्सव साजरा केला जातो. यासाठी देशभरातून भाविक मोठ्या संख्येने येतात. नवरात्रीच्या काळात आणि एरव्हीही दागिन्यांनी नटलेली असते. तेथे रेल्वेने जाणे सर्वाधिक सोईचे आहे. रेणुका देवीला अनेक ठिकाणी विशेषतः कर्नाटकात यल्लमा नावानेही ओळखले जाते. परशुरामाला या डोंगरावर मातेचे दर्शन झाले म्हणून याला ‘मातापूर’ म्हणू लागले. शेजारच्या आंध्रप्रदेशात ‘ऊर’ म्हणजे गाव ते ‘ माऊर‘ आणि पुढे ‘माहूर‘ झाले. माहूरगडावरच श्री दत्तात्रयांचा जन्म झाला अशीही भाविकांची श्रद्धा आहे.

👉 _*तिसरे पीठ- श्री तुळजाभवानी माता (श्रीक्षेत्र तुळजापूर)*_ : महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. तुळजाभवानीला महाराष्ट्राची कुलस्वामिनीही म्हटले जाते. तुळजाभवानी ही भोसले घराण्याची कुलदेवी. हे गाव बालाघाटच्या एका कड्यावर वसले आहे. मंदिराच्या काही भागाची धाटणी हेमाडपंती आहे. इतिहास व पुरातत्त्वदृष्ट्या हे मंदिर राष्ट्रकुट अथवा यादवकालीन मानले जाते. तर काहींच्या मते हे 17 व्या किंवा 18 व्या शतकातील मंदिर आहे.
तुळजाभवानी मंदिरात अमृतकुंड आहे. अमृतकुंडात स्नान करूनच भाविक दर्शनासाठी जातात. तुळजाभवानी मंदिराचे अस्तित्व बाराव्या शतकापासून असल्याचे बोलले जाते. मंदिराचे बांधकाम पूर्णपणे दगडामध्ये केलेले आहे. दरवर्षी भाद्रपद वद्य अष्टमीला देवीची मुख्य मूर्ती सिंहासनावरून हलविली जाते. त्यानंतर नवरात्रीच्या प्रारंभी ती सिंहासनावर येते.
तुळजाभवानी देवीची महती तशी हिंदू पुराणातून खूपच विस्ताराने सांगितली गेली आहे. त्या माहितीनुसार असुरांचा, दैत्यांचा संहार करून विश्‍वात नीती व धर्माचरण यांची पुनर्स्थापना करण्याचे महत्त्वाचे कार्य तुळजाभवानी देवीने प्रत्येक युगामध्ये केले आहे. 
👉 _*वणीचे अर्ध शक्तीपीठ – ‘सप्तशृंगीदेवी’ (सप्तश्रृंगगड,वणी)*_ : महाराष्ट्रात देवीच्या साडेतीन पीठांपैकी अर्धे पीठ असलेली सप्तशृंगीदेवी नाशिकपासून 65 किलोमीटरवरील 4800 फूट उंचावरील सप्तशृंगगडावर वसलेली आहे. मूर्ती दहा फूट उंचीची आहे. देवीची मूर्ती अतिभव्य असून अठरा हातांची आहे. प्रत्येक हातात एक शस्त्र आहे. मूर्तीला शेंदूर फासण्याची प्रथा येथे आहे. ही स्वयंभू आहे. महिषासुरमर्दिनी असेही तिला म्हटले जाते. 
डोंगरातून वाट काढून देवीच्या दर्शनासाठी पायर्‍या तयार करण्यात आल्या आहेत. दर्शनासाठी 500 पायर्‍या चढून वर जावे लागते. आता थेट शिखरापर्यंत मोटारीही जाऊ लागल्या आहेत. प्राचीन काळी मार्कंडेय ऋषींचा आश्रम याच ठिकाणी होता. त्यांनी आदिशक्तीचे तप करून तिला प्रसन्न करून घेतले व तिला या डोंगरावर वास्तव्य करण्याची विनंती केल्याचे सांगितले जाते. त्यामुळे येथील एका डोंगराचे नामकरण मार्कंडेय देवीची मूर्ती 8 फूट उंचीची असून शेंदूराने लेपलेली आहे. 
कर्णफुले, नथ, मंगळसुत्र, कमरपट्टा, तोडे परिधान केलेली ही सप्तशृंगी देवी भक्ताच्या हाकेला धावून जाणारी आहे. सप्तशृंगीदेवीला महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वतीचे ओंकाररूप समजण्यात येते. शुंभनिशुंभ व महिषासुर या पाशवी शक्तीच्या असुरांचा नाश केल्यावर तप-साधनेसाठी देवीने या गडावर वास्तव्य केले. सह्याद्रीच्या या उंच कड्यास सात शिखरे आहेत. त्यावरून या स्थानाचे नावसप्तशृंगगड पडले. हे देवीचे मूळ पीठ मानले जाते. या ठिकाणी नवरात्रात तसेच चैत्र महिन्यात यात्रा भरते.
👉 _*साडेतीन शक्तिपीठांची दंतकथा*_
पूर्वी दक्षाने बृहस्पतीराव या नावाचा मोठा यज्ञ केला. या यज्ञात शंकराला न बोलावता सर्व देवांना बोलावले. शिवपत्नी सती या यज्ञाला आमंत्रण नसताना गेली. यज्ञात शिवाला हबीरभाग दिला गेला नाही, त्यामुळे सतीने रागाने यज्ञात उडी घेतली. शंकराला हे कळल्यानंतर त्याने यज्ञाचा विध्वंस केला. सतीचे कलेवर (देह) हातात घेऊन श्री शंकर त्रैलोक्यात हिंडू लागले. ही स्थिती पाहून विष्णूने सुदर्शन चक‘ सोडले व सतीच्या शरीराचे 51 तुकडे ठिकठिकाणी पाडले. हे तुकडे ज्या ठिकाणी पडले, हीच 51 शक्तिपीठे म्हणून गणली जाऊ लागली.

Advertisements

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

​’जो शिकवतो तो शिक्षक’ या संकल्पने पासून ‘जो शिक्षा करतो तो शिक्षक’ या संकल्पने पर्यंत अभ्यासाचे आणि आयुष्याचे धड़े देणार्या माझ्या सर्व शिक्षकांना सादर प्रणाम 🙏 शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Advertisements

आनंद

           ” आनंद”

अगं  माझा  चश्मा  कुठे  आहे..?

अहो  तुमच्या  डोळ्यावरच  आहे  की….

अशी  गंमत  झाल्यावर  मिळणारा  

*आनंद!*
..

बाप  होण्यापेक्षाही… 

आजोबा/आजी  होण्याचा 

 *आनंद!*
..

चहात  साखर  किंवा  भाजीत  मीठ विसरलेले  असतानाही,  

न  बोलता…

मिश्किलपणे  संपवून  टाकण्याचा  एक  

*वेगळाच  आनंद!*
..

नातवंडाच्या  कृपेने  अंगावरील  कपडे 

ओले  झाल्याचा 

*वत्सल  आनंद !*

आणि

त्यांनी  केलेले  हट्ट  पुरविण्याचा  

*गोड  आनंद!*
..

सूनेने  न  मागता  आणून  दिलेल्या  चहाचा 

व  औषध  घेतले  का..? 

या  प्रेमळ  चौकशीचा  

*मोठा  आनंद!*
..

वाढदिवसाला  मुलाने  दिलेल्या  शालीचा….

*ऊबदार  आनंद!*
..

आपण  कुटुंबाला  हवे  आहोत……

या  भावनेचा  

*सुप्त  आनंद!*
..

दातात  अडकलेल्या  मक्याच्या  कणसाचा  कण 

निघाल्याचा  सुद्धा…..

 *आनंदच!*
..

दुपारी  जेवणानंतर  पेपर  वाचता वाचता  

लागलेली  डुलकी …

 *परमानंद. !*
..

बाहरे छान पाऊस पडतोय.. हवेत हवाहवासा गारवा… 

आणि हाती पडावी गरमागरम भजी..

*स्वादानंद!*
..

रात्रीची निरव शांतता..

आराम खुर्चीवर डोळे मिटून

पहुडलेल्या क्षणी..

आपली आवडती गझल..

रेडिओने गुणगुणावी…

*स्वर्गीय आनंद!*
..

एखादी कविता किंवा लेख

आपण पोस्ट करावा..

मित्रांनी त्याला भरभरुन 

दाद द्यावी…

*साहित्यानंद!*
..

मनातल्या निरनिराळ्या 

शंका कुशंका..

मन अशांत अशांत झालंय

आणि देवघरातल्या भजनामुळे

सारे सांवट दूर व्हावे..

*कैवल्यानंद!*
..

मित्रांच्या  साठीशांती  समारंभाचा  आनंद…

तिथे  भेटलेल्या  जुन्या  सवंगड्यांमुळे होणारा… 

*अपार  आनंद!*
कधीकाळी सरकारी कृपेने

महागाई भत्त्यात वाढ होऊन तीनचारशे रुपये जास्त पेन्शन हातात पडली की होणारा..

*आर्थिक आनंद!*
..

सर्वांनी  सारे  सारे  नकारात्मक  विचार  सोडून  दिले  की  मिळणारा…. *निर्भेळ  “आनंद”!*
..

आणि  या  सर्व  आनंदाची  बेरीज  करून  ती  मनाच्या  कप्प्यात  साठविली  की  पडल्यापडल्या  लागलेली  शांत  झोप  म्हणजेच… 

*”ब्रह्मानंद” !!!*

           *”आनंद “*

Advertisements
%d bloggers like this: