Tag Archive | आजारपण

दुध, फळं

“दुध, फळं : वाढत्या महागाईतील श्रीमंतीचं लक्षण”


दोन महिन्यांपूर्वी एका छोट्याशा आजारपणाचं निमित्तं होऊन मला हॉस्पिटल मध्ये भरती व्हावं लागलं. उपचारांच्या दरम्यान रोज राउंडला येणाऱ्या डॉक्टरांशीही छान ओळख झाली होती. त्यात सर्वात सिनिअर होते – डॉ. पवार. हॉस्पिटलचे मालकही तेच होते. साधारण पन्नाशीला आलेले असावेत. मध्यम बांधा, उंच आणि चेहेऱ्यावर कमालीचं तेज. रोज सकाळी ११ वाजता आणि संध्याकाळी ६ वाजता ते राउंडला आले की, ICU मधलं वातावरणच बदलून जात असे. त्यांच्या चेहेऱ्यावरच हास्य आणि या वयातही असलेला सळसळता उत्साह पाहून वाटे की, त्यांना पाहण्यासाठी तरी महिन्यातून किमान एकदा मी याच हॉस्पिटलमध्ये भरती व्हावे.”काही माणसं आजन्म टवटवीत कशी राहतात ना..! काल रात्री पवार डॉक्टरांना एक वाजता तातडीने कुणावरतरी उपचारासाठी घरून यावं लागलं. रात्री इतक्या उशीराही किती फ्रेश होते ते. काय खातात ना अशी माणसं कुणास ठाऊक…!” मी न राहवून शेजारीच उभ्या असलेला नर्सला बोलले. “फळं खातात ताई.” ती लगेच उत्तरली. “श्रीमंत आहेत ते.. रोज जेवताना फळं, दुध.. असं सगळं खाल्ल्यावर फ्रेश राहणार नाही तर काय..? आपण मध्यमवर्गीय लोक साधं भाजी, भात, आमटी, चपाती खाणार… इच्छा असली तरी ही अशी चैन आपल्याला कशी जमायची?” एरवी फारसं न बोलणाऱ्या सुजाता नर्सकडून आज हे असं काहीतरी ऐकून मला थोडा धक्काच बसला होता. ती कामाला निघून गेली. पुढे काही दिवसांनी मी बरी होऊन घरी आले. तिची वाक्यं मात्र मनात खोल घर करून राहिली.

 

काळ किती बदलला आहे नाही..! अगदी अलीकडे पर्यंत गाडी, बंगला, मोबाईल, टीवी, फ्रीज… उंची कपडे, दागदागिने.. या गोष्टी समाजात श्रीमंतीचं प्रतिक मानल्या जात असत. काही महिन्यांपूर्वी बाबांनी कार घेतली तेव्हापासून अचानक त्यांची सगळी कामं पटापट व्हायला लागली. लोकं त्यांच्याशी पूर्वीपेक्षा जास्त अदबीने बोलायला लागले. पूर्वीचेच बाबा आणि पूर्वीचीच गावातील माणसं… पण एका चारचाकी गाडीची इतकी कमाल. तरीही हे ठीक आहे. पण या यादी मध्ये दुध, फळं, तूप.. याची भर कधी पडली? फक्त भात, भाजी, भाकरी खाणारी माणसं मध्यमवर्गीय आणि रोज आहारात फळं, पालेभाज्या, दुध-दही भरपूर असणारे श्रीमंत. खरंच आहे हे. वाढत्या महागाईपुढे कुणाचं काहीही चालत नाहीये. दुध ही तर अगदी रोजच्या जीवनातील अत्यावश्यक गोष्ट. त्याचेही भाव सामान्यांच्या खिशाला न परवडणारे झालेत. रोजच्या चहाला जेमतेम पुरेल इतकंच दुध विकत घेणाऱ्या खिशासाठी रोज एक कप दुध पिणे हा चैनीचाच विषय ठरतो. फळंही आजकाल सोन्याच्या भावात तोलली जातात. १००-१५० रुपये डझन सफरचंद? एवढा पैसा घालून आजारी न पडण्यापेक्षा… न खाऊन आजारी पडलो तरीही या पेक्षा कमी पैशात औषधं घेऊन बरं होता येतं. खाण्याच्या पदार्थांपेक्षा औषधं स्वस्त… हीच आजची वस्तूस्थिती झाली आहे. परंतु देशाचे नियोजन मंडळ जेव्हा ३२ रुपयांपेक्षा कमी खर्च हाच जर गरिबीचा निकष लावीत असेल… तर तुम्ही-आम्ही तरी काय करणार…?

 

एका बाजूला महागाईच्या नावाने ओरडणारी सामान्य जनता, गृहिणी, कॉलेजवयीन मुलं-मुली… दोन-दोन मोबाईल, पिझ्झा हट, महागड्या हॉटेल मध्ये चैन करतानाही दिसते. घर चालवायचं कसं.. या विषयावर तासन-तास चर्चा रंगवणाऱ्या सुजाण महिला मंडईमध्ये भाजीवालीशी हुज्जत घालून १-२ रुपयाचा डिस्काउंट पदरात पडून घेतात. फळवाल्याच्या गाडीजवळ जाऊन किंमत विचारून परत जाताना दिसतात. पण याच बायका घरी जाताना मुलांना आवडतं म्हणून फास्ट-फूड विकत घेतानाही नजरेस पडतात. या दिवसांत घरखर्चाची तोंडमिळवणी करण्यासाठी विशेष कसब आत्मसात करण्याची गरज आहे हे नक्की. बिस्कीटं, वडापाव, गाड्यांवरचे पदार्थ, अनावश्यक फोनकॉल …. यावर होणारा रोजचा खर्च जर टाळला तर कदाचित या महागाई मध्येही घरातल्या स्त्रीला घर चालवणं जमू शकेल. न जाणो नजीकच्या भविष्यात “घर चालवावे कसे” याचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थाही सुरु होतील… आणि सामान्य वर्गाच्या मुळातल्या हजारो खर्चात या संस्थेच्या फीच्या खर्चाचीही भर पडेल…!

(मुग्धा माईणकर)

कुठेतरी छानसे वाचलेले…………………………………