​” म्हातारी “

​” म्हातारी ”
बस थांबली तसे सगळे प्रवासी आत चढले. म्हातारीनंही आपलं गाठोडं उचललं आणि ती बसमध्ये चढू लागली.

“ए म्हातारे , आत चढू नको. बसमध्ये जागा नाही.” म्हातारीला बघताच कंडक्टर डाफरला.

“का रे बाबा, सगळ्यास्नी जागा आहे आणि मलाच जागा नाही होय ?”म्हातारी बोलली.

” तुझ्याकडं ओझं आहे म्हणून. ……कशाचं आहे ते गठुळं ?”

” वांगी हाईत.”

“मग मागच्या बसनं ये. ही सीटी बस आहे. यातनं सामान नेता येत नाही.”

“एवढं कुठं जास्त आहे ? ……तर नुसती एक बुट्टी तर आहे.” म्हातारीनं एव्हाना वांग्याची बुट्टी बसमध्ये ढकलली होती. तीही वर चढली आणि दारासमोरच्या बाकड्यावर बसली.

” म्हातारे , तिकीट कुठलं देवू ?” कंडक्टरनं विचारलं.

“मार्केट दे बाबा एक.”

“लगेजचं तिकीट पण घ्यावं लागेल.”

“ते काय असतंय ?”

“हे तुझ्याजवळ गठुळं आहे की नाही त्याचंही तिकीट घ्यावं लागेल.”

“एवढं एवढं तर हाय. त्याला रे कसलं तिकीट ?…का उगाचच छळायचं गरीबाला ?”

“तुला सामानाचं तिकीट तर काढावंच लागेल.”

“काढ तर मग ! ..पण मी एक पैसाबी देणार नाही त्याचा.”

इतक्यात बस थांबली. एक सैनिक आपल्या बायकापोरांसह आत शिरला. जवळ दोन मोठ्या बॅगा आणि तीन हात लांबीची एक ट्रंक .

“कंडक्टर , दोन दोन फुल्ल दोन हाफ, रेल्वे स्टेशन.”

कंडक्टरनं तिकिटं फाडून दिली. 

“आता का लगेज फाडला नाहीस रे लेका ? ….का ट्रंकंला लगेज नसतंय ?” म्हातारी बोलली तशी बसमधली सगळी माणसं हसली. “घरात आया भनी आज्ज्या कोण नसल्यावाणी वागत्यात माणसं.” म्हातारीनं पुढं म्हटलं आणि कंडक्टर तोंडात मारल्यासारखा गप्प बसला.

मार्केटचा स्टॉप आला. म्हातारी ओझं घेऊन खाली उतरली. 

ती मंडईत आली तेव्हा बाजार भरायला लागला होता. तिनं डोक्यावरचं गाठोडं खाली ठेवलं.ती एक कापड अंथरुन त्यावर वांगी पसरणाऱ इतक्यात ,” ए म्हातारे , तिथं बसू नको ; ती जागा माझी आहे.”असं कुणीतरी ओरडलं. म्हातारी मग पलीकडच्या बाजूला सरकली.तिथंही तसंच. व्यापारी लोक तिला तिथं बसूच देईनात.म्हातारी पुढं सरकत सरकत पार एका कोपऱ्यात गेली आणि तिथं टेकली.

तो कोपरा पार अडगळीत होता. कधीतरी एखादं गिर्हाइक त्या बाजूला फिरकायचं. बऱ्याच वेळानं एक तरूणी आली. 

“आज्जी , वांगी कशी दिली ?” तिनं विचारलं.

” दहा रुपये पावशेर.”

“पाच रुपयानं देणार ?”

“एवढं स्वस्त देऊन कसं परवडेल बाळा ?”

“मग राहू दे.” ती मुलगी तशीच दुकानात शिरली आणि दहा रुपयांचं चॉकलेट घेऊन गेली.

नंतर एक एक गिर्हाइक येवू लागलं आणि किलो , अर्धा किलो, पाव किलो वांगी घेऊन जाऊ लागलं. 

“मावशे , वांगी कशी ?” एका सुशिक्षित माणसानं गाडीवर बसूनच विचारलं.”

“वीस रूपये अर्धा किलो.” म्हातारी बोलली.

“एक किलो घेतो. निम्म्या दरानं देणार काय सांग !”

“गाडी नवी घेतलीस वाटतं लेकरा ?”

“होय ! कालच आणली.”

“किती रूपयला ?”

“पंचावन्न हजारला.”

” मग त्यांनी किती किंमत कमी केली ? का निम्म्या किंमतीतच आणलीस ?” तो माणूस काही बोलला नाही.गाडीला किक् मारून पळाला.

म्हातारीची वांगी विकून झाली तेव्हा दुपारचे बारा वाजले होते. उन्हानं म्हातारीचं अंग भाजत होतं. तहानेनं तोंड कोरडं पडलं होतं. काल दिवसभर एकादशीचा उपास. सकाळी चहा घ्यायचा होता पण बस चुकली तर काय करायचं म्हणून ती तशीच घोटभर पाणी पिऊन आलेली. मघापासून तिला फिरवायला लागलेलं.

तिनं पैसे मोजले.नुसते दोनशे वीस रूपये. आता यात म्हाताऱ्याची बीपी ची औषधं , आठवड्याचं तेल मीठ , कसं काय बसवायचं ? विचार करत करत ती उठली आणि काय होतंय कळायच्या आतच खाली कोसळली.

अरे ,म्हातारी पडली ,म्हातारी पडली ; असा गलका झाला आणि लोक जमले.

“कशी काय पडली ?”

“उन्हाचा तडाखा बसला असेल.”

“सकाळपासून काही खाल्लं नसेल त्यामुळं साखर कमी झाली असेल.”

“कुणी सांगावं तंबाखू पण लागली असेल.”

सतरा जणांची सतरा तोंडं !

कुणी तिच्या नाकाला कांदा लावला , कुणी पाणी मारलं तर कुणी वारा घातला.

घटकाभरानं म्हातारी शुद्धीवर आली.

“म्हातारे ,सकाळपासून काय खाल्लंय का ?” कुणीतरी विचारलं. म्हातारीनं नकारार्थी मान हलवली.

“चल , मग काय तरी खाऊन घे…नाहीतर कोम्यात जाशील.” 

दोघातिघांनी तिला समोरच्या हॉटेलात नेलं. आत गेल्यावर ती तिथंच खाली फरशीवर बसली.

” आज्जी , वर बसा की !”वेटर बोलला.

“असूदे हितंच .”

“काय खाणार ?”

“काय हाय ?”

” बैंगन मसाला आणि रोटी देवू ?”

“ते काय असतंय ?”

“वांग्याची भाजी आणि रोटी !”

“चालंल.” म्हातारी बोलली.

“तोपर्यंत एक लस्सीबिस्सी द्यारे एक.नाहीतर तुमचं जेवण येईपर्यंत म्हातारी पुन्हा एकदा चक्कर येऊन पडायची .” बरोबर आलेला माणूस बोलला आणि निघून गेला.

म्हातारीचं जेवण झालं.

“आज्जी , भात देऊ ?” वेटरनं विचारलं.

“नको…..पैसं किती झालं ?”

“एकशे ऐंशी रूपये.”

“किती ?”

“एकशे ऐंशी रूपये…..साठ रुपयांच्या दोन रोट्या , नव्वद रुपयांचा बैंगन मसाला आणि तीस रुपयांची लस्सी.”

“एवढं पैसं एका जेवणाला ?”
      यष्टीचं जाण्यायेण्याचं चाळीस रुपये आणि जेवणाचं एकशे ऐंशी…. दोनशे वीस रुपये झाले.
म्हातारी हिशेब लावत होती…
चार महिन्यापुर्वी वांग्याची झाडं लावली, चार महीने त्यांची निगा राखली. कालपासुन वांगी तोडली, आणली, बाज़ारात आणुन विकली. एवढं सगळ करुन पाटीभर वांग्याचे दोनशे विस रुपये….? आणि एका जेवणाचे पण दोनशे विस रुपये….?

   मग कालपासुन जीवाचा एवढा आटापीटा केला तो कशासाठी..? नुसत्या एका जेवणासाठी..? आता आठवडाभर काय करायचं..? तेल मिठ कुठनं आणायचं..? आणि म्हाता-याच्या औषधाच काय..? 
  विचार करुन म्हातारीला पुन्हा चक्कर आली आणि ती भुईवर कोसळली….. कोसळली ती कायमचीच…..!
माफ करा शेतिविषयक नाही….

पण चिंतन करायला लावणारी आहे…..

रहावल नाही म्हणुन पाठवलं ….. वस्तू घेताना समोर कोन आहे, याचा विचार नक्कीच करावा…व्यापारी व परिस्थितीशी लढणारी म्हातारी यातील फरक ओळखावा….

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: