भेळ 

​चटकदार ओली भेळ हा पदार्थ सगळ्यांच्या आवडीचा असतो; पण त्याला फारशी प्रतिष्ठा नाही. म्हणून भेळविक्रीच्या व्यवसायाला प्रतिष्ठाही जेमतेमच! त्यामुळे भेळवाल्याचा धंदा तरी कितीसा विस्तारणार? एक गाडी, दुसरी गाडी, फार तर एखादं छोटं दुकान यापलीकडे भेळवाला ती काय प्रगती करणार, असाच एकूण मामला. पण या वास्तवाची दुसरी बाजू पुण्यात आहे.. त्या बाजूचं नाव- ‘कल्याण भेळ’! शून्यातून सुरू झालेला हा व्यवसाय आता यशाच्या शिखरावर जाऊन थांबला आहे.

१९७२-७३ चा तो काळ असेल. त्याचे वडील श्रीहरी त्यावेळी पुण्याच्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये हमालीचं काम करायचे. हे कोंढरे कुटुंब मूळचं पुणे जिल्ह्य़ातल्या मुळशी तालुक्यातलं. कोंढूर हे त्यांचं गाव. आर्थिक विवंचना सुटावी म्हणून श्रीहरी कोंढरे यांनी पुणे गाठलं. सुरुवातीला ते मालधक्क्यावर हमाली करत होते. पुढे त्यांची हमाली मार्केट यार्डमध्ये गूळ-बाजारात सुरू झाली. त्यांचा मुलगा रमेश महापालिकेच्या शाळेत शिकत होता. या शाळेची ओळख ‘सव्वीस नंबरची शाळा’ अशीच. हमालीच्या कामातूनही कुटुंबाचं भागेना म्हणून मग रमेशची आई मुक्ताबाई यांनी घरोघरी धुणीभांडय़ाची कामं सुरू केली. दारोदार फिरून भाजी विकायचंही काम केलं. रडतखडत कुटुंबाची एकूण तोंडमिळवणी सुरू होती. रमेश चौथी पास झाला आणि घरच्या या ओढगस्तीमुळे त्याला शाळा सोडून द्यावी लागली..

शाळा तर सुटली; पण आता करायचं काय? मग तोही वडिलांबरोबर मार्केट यार्डात जाऊ लागला. अवघं नऊ -दहा वर्षांचं वय. हमालीकाम तर शक्यच नव्हतं. त्यामुळे त्याला गूळखडे शिवायचं काम मिळालं. गुळाच्या ढेपा पोत्यात बंद करून त्याला टाके मारायचे असं ते काम होतं. एक खडा शिवला की सहा पैसे मिळायचे. पुढे ही मजुरी वाढली. सहाचे आठ आणि नंतर दहा पैसे मिळू लागले. आई दिवसभर भाजी विकायची. पायपीट खूप व्हायची; पण त्यातून फार काही पैसे हाती येत नव्हते. म्हणून आईनं ठरवलं की, या पायपिटीपेक्षा काहीतरी बैठा व्यवसाय करून बघू. स्वत:ची जागा तर नव्हतीच. त्यामुळे टिंबर मार्केटच्या रस्त्यावरचा पदपथ त्यांनी गाठला आणि टोपलीतून सुकी भेळ विकायला सुरुवात केली. या भेळीसाठी जी चटणी त्या करायच्या तिची चटक हळूहळू गिऱ्हाईकांना लागली. रोज पाच-पन्नास रुपयांचा धंदा व्हायला लागला. हिरवी मिरची, पुदिना, कोथिंबीर, धणे वगैरेंचं मिश्रण असलेली ती चटकदार चटणीची भेळ खूपच ग्राहकप्रिय झाली. गूळखडे शिलाईचं काम करणारा रमेश मग आईच्या मदतीला जायला लागला आणि हळूहळू त्याचा या भेळविक्रीत जम बसला. अर्थात धंदा वाढत होता तरी कटकटी असंख्य होत्या. कारण धंदा रस्त्यावरचा होता. महापालिकेचं अतिक्रमण-विरोधी खातं, स्थानिक गुंड, दारुडे, मवाली, फुकटे अशा अनेकांचा त्रास होत होता. तरी रमेश टिच्चून उभा होता. हा धंदा सुरू झाला तो कल्याण सोसायटीच्या बाहेर. म्हणून भेळेचंही नामकरण झालं- ‘कल्याण भेळ’!

या भेळेची चटक खवय्यांना लागल्यावर मग गिऱ्हाईकांकडूनच सूचना सुरू झाल्या- ‘फक्त भेळच काय विकता? पाणीपुरीपण ठेवा, शेवपुरी ठेवा, रगडापुरी ठेवा.’ तेव्हा धंदा होता रस्त्यावर. टोपलीतली ही भेळ मग एका लाकडी खोक्यावर आली. पुढे ते खोकंही पुरेनासं झालं. मग रमेशने एक छोटी हातगाडी बनवून घेतली आणि ‘कल्याण भेळ’ प्रथमच हातगाडीवर गेली. व्यवसाय वाढू लागला तसा बाकीचाही व्याप वाढला. कच्चा माल खरेदी करायला जाण्यासाठी जवळ वाहन नव्हतं. म्हणून एक सायकल घेतली. स्वत:च्या कमाईचं हे त्याचं पहिलं वाहन. पुढे सेकंडहँड लूना घेतली, मग स्कूटर घेतली. आणि हातगाडीवरही चुरमुरे, फरसाण, पाणीपुरीच्या पुऱ्या हा माल मावेनासा झाल्यावर एका टेम्पोची खरेदी झाली. जवळजवळ पंचवीस वर्षे कोंढरे यांचा व्यवसाय रस्त्यावरच सुरू होता. धंदा आता खूप वाढला होता; पण हक्काची जागा नव्हती. त्यातूनच बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावर ‘कल्याण भेळ’चं पहिलं आलिशान, भव्य दुकान कोंढरे यांनी सुरू केलं. ‘कल्याण भेळ’ची गेल्या सात-आठ वर्षांतली प्रगती लक्षवेधी तर आहेच; पण सचोटीच्या व्यावसायिकाला यशाचं शिखर कसं गाठता येतं याचाही तो वस्तुपाठ आहे. कमालीची स्वच्छता, टापटीप, ग्राहकांशी वागतानाची नम्र वृत्ती, धंद्याची उत्तम जाण, कष्टांची तयारी अशी या व्यवसायाची अनेक वैशिष्टय़ं आहेत. या बळावरच ‘कल्याण भेळ’ हा व्यवसाय वाढत गेला, बहरत गेला. अर्थात एकेका ग्राहकाला कोंढरे यांनी कसं जपलं आहे याची उदाहरणंही थक्क करणारी आहेत.

ओल्या भेळेचं पार्सल घेऊन एक ग्राहक घरी गेला आणि पंधरा मिनिटांत त्याचा दुकानात दूरध्वनी आला की, ‘तुम्ही भेळ दिली; पण भेळेचं चिंचेचं पाणीच या पार्सलमध्ये नाही.’ कर्मचाऱ्यानं केलेली चूक कोंढरे यांच्या लक्षात आली. चिंचेचं पाणीच नसेल तर ती कसली ओली भेळ? कोंढरे म्हणाले, ‘तुमचा पत्ता सांगा आणि थोडा वेळ थांबा. तुमच्या घरी भेळेचं पाणी घेऊन येतो.’ दुकानापासून सहा किलोमीटर अंतरावर ते घर होतं. थोडय़ाच वेळात कोंढरे त्या घरी भेळेचं चिंचेचं पाणी घेऊन पोहोचले आणि त्या ग्राहकाला आश्चर्याचा धक्काच बसला. तो म्हणाला, ‘शेठना थँक्यू सांग.’ त्यावर कोंढरे म्हणाले, ‘मीच शेठ आहे साहेब..’

बिबवेवाडीतील आलिशान दुकानापाठोपाठ कोंढरे जेथे हातगाडीवर भेळ विकत होते, त्याच जागेच्या समोर त्यांनी एक मोठं दुकान घेतलं आणि त्या जागेत ‘कल्याण भेळ’ची दुसरी शाखा सुरू झाली. पाहता पाहता कोथरूड, हिंजवडी, हडपसर, लुल्लानगर, बाणेर, विधी महाविद्यालय रस्ता अशा शाखा त्यांनी सुरू केल्या. कल्याण भेळची आता पुण्यात आठ आलिशान दुकानं आहेत. त्यातली काही वातानुकूलित आहेत. टोपलीत सुरू झालेल्या या धंद्याला कोंढरे यांनी परिश्रमपूर्वक विस्तारत नेलं आणि आता तर त्याला एका मोठय़ा उद्योगाचंच स्वरूप आलं आहे. या धंद्याचं ठळक वैशिष्टय़ म्हणजे कोंढरे हेच या सर्व दुकानांचं व्यवस्थापन करतात. ‘आमचं नाव वापरा आणि तुम्ही धंदा करा..’ असा प्रकार नाही. त्यांच्या या भेळेच्या उद्योगात आता ऐंशी-नव्वद कामगार आहेत. कोंढरे यांचं एकच कुटुंब पूर्वी भेळेच्या या व्यवसायावर अवलंबून होतं. आता नव्वद कुटुंबं या व्यवसायावर अवलंबून आहेत. ओली भेळ, पाणीपुरी, रगडापुरी, शेवपुरी, एसपीडीपी या सगळ्या पदार्थाचा खेळ असतो चिंचेच्या पाण्यावर. हे पाणी आणि त्यासाठीचे मसाले आजही कोंढरे यांच्याच देखरेखीखाली तयार होतात. त्यामुळे ‘कल्याण भेळे’ची चव वर्षांनुवर्षे टिकवून ठेवण्यात त्यांना यश आलेलं आहे. म्हणूनच कल्याण भेळेच्या दुकानांची संख्या एकाची दोन, दोनाची चार या गतीनं वाढत गेली..

या धावपळीच्या युगात सध्या लोकांकडे वेळ कमी आहे आणि अनेक ठिकाणांहून मागणी असली तरी गावोगावी तर शाखा सुरू करणं शक्यच नाही. ही परिस्थिती ओळखून कोंढरे यांनी चार वर्षांपूर्वी भेळेसह सर्व पदार्थ पॅकिंगच्या स्वरूपात बाजारात आणले. अर्थात त्यातही घाईगर्दी केली नाही. प्रथम सुकी भेळ, नंतर ओली भेळ, मग चिंचेचं पाणी, भेळेचा मसाला, पाणीपुरी, मग शेवेचे प्रकार, मग फरसाणचे प्रकार असं करत करत आता त्यांची चौदा उत्पादनं बाजारात आली आहेत. पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातही या इन्स्टंट पदार्थाचा चांगलाच जम बसला आहे. केवळ देशातच नाही, तर परदेशातही ही चव पोहोचली आहे. या उत्पादनांसाठी कोंढरे यांनी एक कारखानाही सुरू केला आहे आणि त्याची सर्व जबाबदारी कोंढरे यांचा मुलगा गिरीश याच्यावर आहे. गिरीश ही या व्यवसायातली पुढची पिढी. अर्थात सत्तरीच्या घरात असलेल्या आईचं आणि त्यांची पत्नी मंदा यांचंही लक्ष धंद्यावर घरातून आहेच. कोंढरे सांगत होते- ‘थोडा उन्हाळा जाणवायला लागल्यामुळे आई कालच मला म्हणाली- रमेश, उन्हं तापायला लागलीयेत, आता जरा मालावर ध्यान ठेवा.’

मार्केट यार्डपासून कोंढरे यांचा प्रवास सुरू झाला, तो आता एका मोठय़ा उद्योगापर्यंत येऊन पोहोचला आहे. भेळेच्या व्यवसायातही किती मोठी प्रगती होऊ शकते याचं उदाहरण म्हणजे ‘कल्याण भेळ.’ त्याहीपेक्षा महत्त्वाचं हे की, व्यवसायात मिळालेल्या यशाची, पैशांची, रोज होत असलेल्या लक्षावधीच्या व्यवहाराची, मालकीच्या जागांची, आलेल्या श्रीमंतीची हवा या माणसाच्या डोक्यात जराही गेलेली नाही. नेहमी पांढरा पायजमा, पांढरा शर्ट आणि डोक्यावर गांधी टोपी अशा पेहेरावातील कोंढरे हे ‘कल्याण भेळ’ नामक एका मोठय़ा उद्योग-व्यवसायाचे मालक आहेत, हे सांगूनही अनेकांचा विश्वास बसणार नाही, इतका हा माणूस साधा आहे. एकीकडे लाखो-कोटींची उलाढाल करत दुकानांची साखळी बांधत गेलेलं हे कुटुंब कित्येक वर्षे ‘हमालनगर’मध्येच राहत होतं. ‘आधी दुकानं वाढवू या. घर करता येईल नंतर!’ ही भावना त्यामागे होती. त्यामुळेच कोंढरे यांचे पाय आज यशस्वीतेनंतरही जमिनीवरच आहेत.

माणसाचा प्रवास यशाच्या दिशेनं सुरू झाला की माणसं बदलतात. अध्र्या हळकुंडानं पिवळी होतात. कोंढरेंचं तसं नाही. ‘पाय जमिनीवर ठेवले म्हणून तर इथपर्यंत पोहोचलो!’ हे त्यांच्या यशस्वी व्यावसायिक जीवनाचं तत्त्वज्ञान आहे. शिवाय, हे तत्त्वज्ञान सांगणारे कोंढरे फक्त चौथी पास आहेत. त्यामुळे त्याचं महत्त्वही कितीतरी अधिक!

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: