अगं अगं म्हशी मला तूच नेशी

—————————————–

अगं अगं म्हशी मला तूच नेशी

——————————————

साधारण एक महिन्यापूर्वीची गोष्ट आहे.
त्या दिवशी बसने जायचे होते. घरून सव्वासातला निघालो. साधारण ५-७ मिनिटे चालत गेलो की मुख्य रस्ता लागतो व रस्ता ओलांडला की बसचा थांबा आहे. ट्रॅफिकच्या गर्दीच्या वेळी पुण्यात कुठलाही रस्ता ओलांडणे हे एक दिव्यच असते. मी जाऊन रस्त्याच्या अलीकडे उभा राहिलो व रस्ता कधी ओलांडता येईल  याची वाट बघत थांबलो. त्या दिवशी ट्रॅफिक जरा जास्तच होता. या रस्त्याची खासियत अशी आहे की पुणे विद्यापीठ ते व्हाया पाषाण रोड- व्हाया चांदणी चौक-पौड रोडच्या डेपोपर्यंत म्हणजे साधारा ५-६ किमी अंतरामध्ये कुठेही सिग्नल नाही. त्यामुळे सगळ्याच गाडय़ा वेगाने एखादा लोंढा यावा अशा येत होत्या. एखाद्या कारखान्याच्या चिमणीमधून जसे धुराचे लोट बाहेर पडत असतात तशाच कार-स्कूटर- मोटारसायकल व बस रस्त्याच्या दोन्हीकडून जात-येत होत्या. बहुधा २-३ मिनिटे गेली की एखादी बारीकशी गॅप मिळते व त्यामध्ये जीव मुठीत धरून रस्ता क्रॉस करता येतो. आज काय प्रकार होता माहीत नाही, मध्ये गॅप येतच नव्हती. बऱ्याच वेळा मी ४-५ पावलं पुढे जायचो आणि वेडय़ा-वाकडय़ा येणाऱ्या गाडय़ांना घाबरून परत मागे यायचो. पण पुढे जाण्याची माझी हिंमत होत नव्हती.
वाट बघता बघता १० मिनिटे झाली पण ‘नो चान्स’. अशा वेळेस वाटते की, काहीतरी कारण घडून ट्रॅफिक जाम व्हावा, त्यामुळे आपोआपच क्रॉस करणाऱ्यांची सोय होते. पण तसेही काही आज घडत नव्हते. १० मिनिटांनंतर मी होतो त्याच ठिकाणी होतो. तेवढय़ात माझी नजर मागे गेली. मागे एक तगडी म्हैस उभी होती व तिच्या गळ्यातली दोरी धरून मुलगा उभा होता. म्हशीकडे बघताच मी मनातल्या मनात ‘युरेका’ म्हणून ओरडलो. मी लगेच मुलाकडे गेलो.
मी : अरे, म्हैस घेऊन पलीकडे चलणार का?

मुलगा : कशाकरता, काय करायचं आहे?

मी : करायचं काहीच नाही. फक्त पलीकडे माझ्याबरोबर चालायचे आणि लगेच परत यायचे. हे घे ५ रुपये.

मुलाला काहीच अर्थबोध झाला नसावा, पण ५ रुपये मिळणार व करायचं काहीच नाही हे त्याला समजले.

मुलगा : चला.

म्हशीला ट्रॅफिकशी काहीच देणे- घेणे नव्हते. मुलगा म्हैस घेऊन निघाला, मी म्हशीची ढाल करून तिच्या उजव्या बाजूने रस्ता क्रॉस करायला सुरुवात केली. इतक्या धुवाधार ट्रॅफिक असूनही मी मजेत रस्ता ओलांडत होतो. अर्धा रस्ता ओलंडल्यानंतर मी क्षणभर घाबरलो होतो, कारण आता ट्रॅफिक माझ्या बाजूने यायला सुरुवात झाली व म्हैस माझ्या डावीकडे होती. काही वाहनचालकांनी म्हशीकरिता कर्कश हॉर्न वाजवले, काहींनी म्हशीला मनात शिव्या दिल्या असतील. आम्ही थाटात पलीकडे पाहोचलो. मी त्या मुलाला ५ रुपये दिले व त्याचे आभार मानले. पलीकडे चार वयस्कर क्रॉस करण्याकरता उभे होते. मला इतक्या आरामात रस्ता क्रॉस करताना बघून सगळेच मुलाला म्हणाले, अरे आम्हाला पण पलीकडे सोड. आम्ही २-२ रुपये देऊ. लगेच मुलाने म्हैस मागे वळवली व चौघांना पलीकडे सोडले. मी शेजारीच नवीन तयार केलेल्या बसथांब्यावर जाऊन बसलो.
रस्त्यावरचा ट्रॅफिक मगाशी होता तसाच टॉप गीअरमध्ये सुरू होता. सहजच माझं लक्ष पलीकडून येणाऱ्या म्हशीकडे गेले. दोन वयस्कर माणसे म्हशीच्या आडोशाने रस्ता ओलांडत होती. म्हशीच्या फेऱ्या सुरू झालेल्या पाहून मजा वाटली आणि लक्षात आलं की म्हशीबरोबर रस्ता क्रॉस करणं यासारखा सुरक्षित पर्याय नाही. तेवढय़ात त्या मुलाचं लक्ष माझ्याकडे गेलं व लगेच त्याने आनंदाने हात हलवला. बहुधा मनामध्ये मला थँक्स म्हटलं असावं. मी पण हात हलवून त्याच्याशी ‘संवाद’ साधला. तेवढय़ात माझी बस आली. मी निघालो.

नंतर साधारण महिनाभर माझी जा- ये स्कूटरने सुरू होती. स्कूटर असली की जाणा-येण्याचा माझा रस्ता थोडा बदलतो. आज बसने जाण्याकरता मी बावधनहून निघालो. चालत मुख्य रस्त्याला पोहोचलो. साडेसातची वेळ असल्यामुळे दोन्ही बाजूंनी सुसाट गाडय़ा धावत होत्या, सगळीकडून हेडलाइट डोळ्यांवर येत होते, कर्कश हॉर्न वाजत होते. काही दुचाकी उलटीकरून जा-ये करत होत्या, काही फूटपाथवरून जात-येत होत्या. थोडक्यात म्हणजे पुण्यातल्या कुठल्याही हमरस्त्याचे चित्र समोर होते. चित्रातला एक रंग मिसिंग आहे हे पटकन लक्षात आलं, आणि तो म्हणजे मुठीत जीव घेऊन रस्ता क्रॉस करताना कुणीच दिसत नव्हते. मी मनात म्हटले की, हे सगळे गेले कुठे? तेवढय़ात माझे लक्ष  बाजूलाच उभ्या असलेल्या म्हशीकडे गेले आणि म्हशीबरोबरच्या मुलाचे लक्ष माझ्याकडे गेले. बघताच मुलाने हात हलवला व ओरडला, ‘काका, चला पलीकडे सोडतो, फ्रीमध्ये, पैसे द्यायचे नाहीत.’
माझ्या डोक्यात महिन्यापूर्वीच्या घटनेची टय़ूब पेटली, ‘आपण याला म्हशीबरोबर रस्ता क्रॉस करण्याचे ५ रुपये दिले होते.’ मुलगा मला थांबा असे म्हणाला व धावत जवळच्या फुलवाल्याकडून एक फुलांचा गुच्छ घेऊन आला. मला गुच्छ देऊन मला नमस्कार केला व म्हणाला, ‘चला.’ आम्ही दोघं लगेच म्हशीच्या एका बाजूने रस्त्यावर उतरलो व चालायला लागलो. महिन्यापूर्वी गेलो होतो तेव्हा म्हैस थोडी बिचकत होती. आज ती एकदमच तरबेज झाल्यासारखी दिसत होती. आपल्याकडे सिग्नल तोडणारे, उलटीकडून येणारे, फूटपाथवर गाडय़ा घालणारे जेवढे कंफर्टेबल असतात तेवढीच. चालता चालता..
मी : अरे म्हशीला घेऊन इकडे काय करत होता? मला गुच्छ कशाकरता दिला?

मुलगा : गेल्या वेळेला आपण भेटलो त्या दिवसापासून रोजच या वेळेला इथे असतो आणि रोजच तुमची वाट बघत होतो.

मी : कशाकरता?

मुलगा : तुम्हीच मला हा मार्ग दाखवला. संध्याकाळी म्हशीला घेऊन रोज इथे येतो व रस्ता क्रॉस करणाऱ्यांची मदत करतो. गेल्या १० दिवसांपासून याच रोडवर आता ८ म्हशी सोडल्या आहेत. घरचे सगळेच २-३ तास थांबतात. रोजचे एका म्हशीमागे साधारण ८० ते १०० रुपये मिळतात. या वेळेला म्हशींना काहीच काम नसतं. त्यांची खाण्यानंतरची शतपावली होते. रात्री झोप पण छान लागत असेल. त्यामुळे दूध पण वाढलं आहे.

मी : ट्रॅफिक कमी असेल तर ट्रिपा मिळत नसतील!

मुलगा :  काका, ट्रॅफिक कमी असताना गाडय़ावाले फार स्पीडनी आणि वेडय़ावाकडय़ा गाडय़ा हाकतात. त्यामुळे माझ्या ट्रिपांना मरण नाही. अगदी दुपारी, सकाळी लवकर, किंवा रात्री ९ नंतर अगदीच बेताचा असतो. तेव्हा मीच येत नाही.

मी : वा, क्या बात है!

तेवढय़ात आम्ही पलीकडे पोहोचलो. तिथे ५-६ वयस्क स्त्री-पुरुष उभे होतेच. मुलाने लगेच त्यांना माझी ओळख करून दिली, ‘यांनीच ही कल्पना दिली, वगैरे’.

मी मनातून जरा आनंदलो व देवाचे आभार मानले. सगळ्यांनी माझे आभार मानले. तिघा जणांनी मला बाजूला घेतले व मुलाला सांगितले, ‘‘आम्ही पुढच्या ट्रीपला येतो. तू जा पुढे.

एक जण : तुम्ही आमचा व आमच्या घरच्यांचा फार मोठा प्रॉब्लेम सोडवला आहे. आता घरून बाहेर पडताना बायको बजावते, ‘म्हैस असेल तरच रस्ता क्रॉस करा, २-४ रुपये जाऊ देत.’ दुसरी व्यक्ती : पूर्वी रोज रस्ता ओलांडताना समोर म्हशीवर बसलेले यमराज दिसायचे. आता त्यांची म्हैसच बरोबर असते. त्यामुळे एकदम ‘बि -न – धा- स’

तिसरी व्यक्ती : आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या पुढच्या मीटिंगला आम्ही तुम्हाला बोलावू. तुमचा सत्कार आम्हाला करायचा आहे. नक्की यायचं आहे. तुमची म्हशीची कल्पना म्हणजे, तोड नाही. फोन नंबरची देवाण- घेवाण झाली.

त्यांचा निरोप घेऊन मी स्टॉपवर पोहोचलो. तिथे बसायला नवीनच बाक केले आहे. बाकावर बसलो आणि कल्पनेच्या दुनियेत पोहोचलो.

पुढच्या काही महिन्यांनंतरची वर्तमानपत्रे मला दिसायला लागली.
* ‘सीनियर सिटिझन्सच्या मदतीला म्हशी सरसावल्या’

पुण्यातल्या रस्त्यांवर चालणे ‘मौत का कुआ’मध्ये गाडी चालवण्याइतके धोकादायक होते. तुम्हाला कोण आणि केव्हा उडवेल ही चालणाऱ्यांच्या मनात सतत धास्ती असायची. म्हशीचा आडोसा घेऊन चालताना लोकांची ही धास्ती आता संपली आहे. खाली निरनिराळ्या चौकातले वयस्कर मंडळींना घेऊन रस्ता क्रॉस करणाऱ्या म्हशींचे फोटो होते.

* ‘रस्त्यावरच्या स्पीड ब्रेकरना रामराम’

बहुतेक रस्त्यांवरचे स्पीड ब्रेकर हद्दपार आहेत. रस्त्यांवर ठरावीक अंतरावर म्हशींची जा-ये सुरू केल्यामुळे वाहनांच्या वेगावर आपोआपच वचक बसला आहे. ‘वाहने सावकाश चालवा, पुढे स्पीड ब्रेकर आहे’ या पाटय़ा जाऊन आता ‘वाहने सावकाश चालवा, पुढे म्हशी आहेत’ अशा पाटय़ा आल्या आहेत.

* ‘ऑथरेपेडिक क्लिनिकमधली गर्दी ओसरली’

रस्त्यांवरचे स्पीड ब्रेकर्स काढल्यामुळे वाहनचालकांचे पाठीचे व कंबरेचे दुखणे यात लक्षणीय घट नोंदवण्यात आली आहे.

* ‘शाळाचालकांची म्हशीला पसंती’

शाळा सुटल्यानंतर लहान मुले रस्ता ओलांडताना वाहनांची नेहमीच दहशत असायची. शाळेने शाळा सुटताना शाळेसमोर २ म्हशी तैनात कराव्या अशी पालकांनी शाळा चालकांकडे मागणी केली आहे. बहुतेक शाळाचालकांनी याला मंजुरी दिली आहे.

* ‘पुण्यात आय-टी पार्कच्या धरतीवर म्हैस पार्कची उभारणी’

शहरामधून आयटीयनस्ना उचलून बस व टॅक्सी रोज आय-टी पार्कमध्ये सोडतात. त्याच धर्तीवर टेम्पो व ट्रक म्हैस पार्कमधून म्हशींना उचलून शहरांमधल्या विविध चौकांत व रस्त्यांवर सोडतील.

* ‘म्हशींना सर्वच शहरांमध्ये डिमांड’

सर्वच मोठय़ा शहारांमध्ये पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेकरिता म्हशींची मदत घेणार. पाहणी पथके पुण्यात दाखल.

* वर्षांतली सगळ्यात ‘इनोव्हेटिव्ह’ कल्पना म्हणून लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता! मीडिया संशोधकाच्या शोधात!!!

काहीतरी गोड आवाजामुळे माझी तंद्री मोडी. शेजारी बसलेली मुलगी सांगत होती, बस येतेय, चला. लांब बस दिसत होती. मी तिच्या मागोमाग पुढे गेलो. बाजूला म्हशीची ट्रीप सुरू होतीच.

तेवढय़ात बस आली. मी म्हशीकडे बघून तिला बाय केलं आणि बसमध्ये चढलो.

– सुधीर करंदीकर

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: