रिकाम्या पोटी की भरल्या पोटी ?

​दिव्य मराठी – रसिक
रिकाम्या पोटी की भरल्या पोटी ?

प्रा. मंजिरी घरत
एका नामवंत उद्योजकाने आपल्या वडिलांविषयी सांगितलेली ही गोष्ट. वडील स्वत: नामवंत डॉक्टर, स्वातंत्र्यसेनानी. वृद्धापकाळी त्यांना पार्किन्सन (कंपवात) या आजाराने गाठले. अर्थातच सर्वोत्कृष्ट वैद्यकीय उपचार चालू झाले. कशातही कसूर नव्हती. औषधे नियमितपणे दिली जात होती, पण पेशंटच्या स्थितीत फारशी सुधारणा नव्हती. हे उद्योजक वडिलांना अमेरिकेला सोबत घेऊन गेले. अमेरिकी डॉक्टरांनी केसचा अभ्यास केला. वैद्यकीय उपचार अगदी योग्य मार्गावर आहेत, दिलेली औषधे अगदी बरोबर आहेत, असे सांगितले. मग चुकतंय तरी कुठे? औषधोपचारांना वडील दाद का नाही देत? डॉक्टरांनी केसचा अधिक सखोल विचार केला. बरेच प्रश्न विचारले. त्यानंतर डॉक्टरांनी औषधोपचार निष्प्रभ का ठरत आहेत, याबद्दल त्यांचे अनुमान सांगितले. जे मुख्य औषध होते, ते रुग्णाला जेवणानंतर दिले जात होते.

जेवणातील प्रोटीन्समुळे हे औषध रक्तात फारसे शोषले जात नव्हते. म्हणजे, जेवणाआधी घेण्याचे औषध जेवणानंतर घेतल्याने औषध व्यर्थ ठरत होते. ही महत्त्वाची बाब, भारतात पेशंटवर उपचार करणार्‍या डॉक्टर, फार्मसिस्टनी ठासून सांगितली नसावी वा रुग्णाच्या नातेवाइकांनीही याबद्दल काही विचारले नसावे. डॉक्टरांच्या या निष्कर्षानंतर कटाक्षाने औषधाची वेळ पाळल्यामुळे वडील औषधाला अपेक्षित प्रतिसाद देऊ लागले.

वरील गोष्ट ‘केस स्टडी’ ठरावी. औषध नुसते वेळेवर, योग्य मात्रेत िनयमित घेऊन चालत नाही, तर ‘बिफोर अँड आफ्टर फूड’चेही शास्त्र पाळावे लागते. तोंडावाटे घेतली जाणारी बहुतांश औषधे ही अन्ननलिका, जठर, आतडे असा प्रवास करून रक्तात शोषली जातात. त्यानंतर त्यांचा अपेक्षित परिणाम दिसतो. औषध किती वेळात आतड्यात पोहोचते, विघटित का अखंड स्वरूपात, आतड्यात त्या वेळी कोणते अन्नपदार्थ, इतर औषधे हजर आहेत का आतडे रिकामे आहे, अशा अनेक बाबींवर औषधांचा रक्तात मिसळून जाण्याचा वेग आणि प्रमाण ठरत असते. रिकाम्यापोटी औषध घेतले तर अन्नाची लुडबुड नसल्याने औषध अर्थातच आतड्यांपर्यंत झटपट पोहोचते. त्याचे रक्तात शोषणही त्वरित होते. सर्वच औषधे रिकाम्या पोटी घ्यावीत, असा तर्कशुद्ध विचार कुणीही करेल. पण प्रत्यक्षात मात्र तसे करता येत नाही. अनेकविध कारणास्तव काही औषधे नाष्टा/जेवण झाल्यावर घेणे योग्य ठरते. काही रिकाम्या पोटी. थोडक्यात, ‘मिल्स अँड मेडिसिन्स’चे नाते समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे.

रिकाम्या पोटी घेण्याची औषध

जेवणाआधी एक तास किंवा साधारणत: जेवणानंतर दोन तास म्हणजे रिकाम्या पोटी, अशी सर्वसाधारण संकल्पना आहे. पॅरासिटॅमॉलसारखे (क्रोसिन, मेटॅसिन, कॅलपॉल वगैरे) ताप-डोकेदुखीवरचे औषध खाण्याआधी अर्धा तास घेतले तर अपेक्षित परिणाम साधते. थायरॉक्सिनसारखे (थायरॉइडच्या कमतरतेत देण्याचे औषध) औषधही जेवणाआधी घेण्याच्या मार्गदर्शक सूचना असतात. कॅल्शियमच्या प्रकाराप्रमाणे ते आधी का नंतर, हे ठरते. उदा. कॅल्शियम कार्बोनेट जेवणानंतर, तर कॅल्शियम सिट्रेट जेवणाआधी वा नंतरही घेऊन चालते. अनेक अँटिबायॉटिक्स जसे की, अमॉक्सिसिलिन, अॅम्पिसिलिन, सिप्रोफ्लोक्सासिन इत्यादींचे रिकाम्या पोटी रक्तात उत्तम शोषण होते. पण बरेचदा रुग्णांना मळमळ, उलट्या असा त्रास होतो व त्यामुळे ‘काही खाऊन औषध घ्या’ असे सांगितले जाते. मधुमेहासाठीचे इन्सुलिन इंजेक्शन व तोंडावाटे घेण्याची इतर अनेक औषधे उदा. ग्लिमेपिराइड, ग्लिकाझाइड ही जेवणाआधी थोडा वेळ घ्यायची असतात. त्यानंतर उशीर न करता वेळेत नाष्टा/जेवण करायचे असते. अॅसिडिटी, अल्सरसाठीची रॅनिटिडीन (उदा. रॅनटॅक, झॅनटॅक, आेमेप्राझोल)सारखी औषधेही जेवणाआधी अर्धा ते एक तास घ्यायची. पण जेल्युसिल, डायजिन यांसारखी अॅसिडिटीवरील औषधे दोन जेवणांच्या मध्ये घ्यायची. म्हणजे पूर्ण रिकाम्या पोटी घ्यायची नाहीत.

भरल्या पोटी घेण्याची औषधे

अनेक वेदनाशामक उदा. आयबुप्रोफेन, डायक्लोफेनॅक, अ‍ॅस्पिरिन रिकाम्या पोटी घेतल्यास जठर, आतड्याला त्रासदायक ठरतात. त्यामुळे पोटात जळजळ, मळमळ, उलट्या होऊ शकतात. रिकाम्या पोटी अशी औषधे दीर्घकाळ घेत राहिल्यास पोटात अल्सरही होऊ शकतात. म्हणून ही औषधे काही खाऊन म्हणजे नाष्टा/जेवण यानंतरच घ्यायची असतात. फंगल इन्फेक्शनवरील काही औषधे उदा. ग्रिसिवोफल्विन, फ्लुकोनाझोल किंवा एड्सवरील काही औषधे, काही व्हिटॅमिन अ, ड, इ, के ही अन्नातील मेदात विरघळून याचे रक्तात शोषण होते, म्हणून जेवणानंतर घ्यायची असतात. मधुमेहावरील काही औषधे अकार मेटफॉर्मिन जेवणासोबत घ्यायची.

औषध-अन्न आंतरक्रिया : काही औषधे (टेट्रासायक्लिन, सिप्रोफ्लेक्सासिन ही जेवणानंतर घेणे योग्य, पण त्यासोबत दूध वा दुग्धजन्य पदार्थ घ्यायचे नाहीत. कारण दुधातील कॅल्शियमची या औषधांबरोबर आंतरक्रिया होते. त्यामुळे औषध रक्तात शोषले जात नाही. लोहयुक्त (आयर्न) औषधांबरोबर चहा-कॉफी टाळणे योग्य, पण लिंबाचा रस वा व्हिटॅमिन ‘सी’ घेतल्यास आयर्नचे रक्तात शोषण चांगले होते. एकंदरच गरम पेये औषधांबरोबर टाळणेच योग्य. औषधासोबत पाणी पिणे उत्तम. अनेक औषधे व अल्कोहोल यांच्यात आंतरक्रिया होऊन घातक दुष्परिणाम होतात. मधुमेह, रक्तदाबावरील औषधे, अँटिहिस्टॅमिन्स (उदा. Avil, Benadryl सारखी औषधे), मेट्रोनिडाझोलसारखे हगवणीवरील औषध अशा अनेक औषधांबरोबर अल्कोहोलची घातक क्रिया होते. एकंदरच औषधोपचार चालू असताना मद्याचा मोह कटाक्षाने टाळणे हितावह ठरते.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: