चौथी पर्यंत हिंदी
मला यत्ता चौथी पर्यंत हिंदी यायचं नाही..
शाळेत विषयच नव्हता..
यायचं नाही म्हणजे नाही…अजाबात नाय…
म्हणून जे काही दिसेल ते मराठीतच समजून घ्यायचं..
मुकद्दर का सिकंदर हा सिनेमा..
आम्ही चाळकरी पोरं “मुकंदर का सिकंदर” असं म्हणायचो..
आणि त्याचा अर्थ आमच्या दृष्टीनं लिटरली मराठी होता: “मुकंदर ? …का सिकंदर?” म्हणजे “चहा की कॉफी?” ..
“मुकंदर ऑर सिकंदर ?”.. मेक युअर चॉईस…
कुर्बानी “पिच्चर” मध्ये आप जैसा कोई हे मस्त डिस्को गाणं आलं..
मूळ अर्थ कळत नसल्यानं जे ऐकू येईल ते खरं..
“आप जैसा कोई मेरी जिंदगी में आये..तो बाप बन जाये..”
सीरीयसली असंच वाटायचं..जोक करायचा म्हणून नव्हे..
मग थोड्या दिवसांनी..
“आप जैसा कोई मेरी जिंदगी में आये..तो वापस जाये..”
असं…
“तोहफा तोहफा..लाया लाया..”असं गाणं सुपरहिट्ट एकदम..
मला त्यात (शिवाजी महाराजांची असते तशी) “तोफ” हा शब्द दिसून मनापासून कोणीतरी युद्धासाठी तोफा घेऊन आलाय आणि तसं गाऊन श्रीदेवीला सांगतोय असं वाटायचं..
“तोफा तोफा लाया लाया..” काय चूक आहे त्यात?
पाण्याच्या टाकी विषयी माहिती देणारं “टाकी ओ टाकी ओ टाकी टाकी टाकी रे..” असंही एक सुंदर गीत होतं..
“प्यार करनेवाले प्यार करते है ‘शाम’ से..” असंही ढिंगचॅक गाणं माझं लाडकं..
‘शान’से हे नंतर कळलं..
पण संध्याकाळपासूनच चौपाटीवर जागा पकडून बसलेली गुटर्गू मंडळी बघून हा माझा अजाण वयातला अर्थही आता बरोबरच वाटतो..
माझा चाळीतला चाळूसोबती मला सिनेमाची स्टोरी सांगत होता..
“….अरे तो प्रेम चोप्रा ना मीनाक्षी शेशाद्रीवर बलात्कार करतो..”
“म्हणजे काय करतो नक्की ?” मी ज्ञानलालासेनं विचारता झालो..
तो थोडा विचारात पडला..
मग …”अरे बलात्कार..म्हणजे हिकडे तिकडे हातबीत लावून सतावतो तिला तो..”
हलकेच मला समजावत तो वदला..
दोघेही तिसरीत होतो..असो..
मराठी, संस्कृत वगैरे मध्येही ऐकून अर्थ लावण्याची बोंबच होती..
“सा विद्या या विमुक्तये” हे शाळेचं बोधवाक्य मला “चावी द्याया विमुक्तये” असं ऐकू यायचं..
अर्थ नाहीच कळायचा..पण चावी किंवा किल्लीशी संबंधित..चावी द्यायला हवी आहे..किंवा तत्सम काहीतरी वाटायचं..
“सदाचार हा थोर सांडू नये तो” हे मला “सदाचार हा थोर सांडून येतो” असं ऐकू यायचं..म्हणजे “मी जरा जाऊन सदाचार सांडतो आणि येतोच परत लगेच..”
”आज ये अंगणा पाहुणा गोजिरा..” अशी कविता होती..
त्यात “श्रावणी न्हातसे..अश्विनी गातसे..” अशी ओळ होती..
मला आमच्या वर्गातल्या त्याच नावाच्या मुली अनुक्रमे नहात आणि गाणं गात आहेत असं डोळ्यासमोर यायचं..
“आली आली सर ही ओली..” हे गाणं ऐकलं की धुवांधार पावसात भिजून ओले झालेले साळवी सर (सर्वात कडक्क सर..!!) वर्गाच्या दारात आलेत असं वाटायचं..
गंजका खिळा,पत्रा वगैरे लागला की धनुर्वात होतो असं ऐकलेलं..आम्ही एकमेकांना सांगायचो..”अरे पत्रा लागलाय ना तुला..आता तुला धनुर्विद्या होणार”.. की बिचारा कापलेला पोरगा गळफटायाचा..
नगरपालिकेच्या व्यायामशाळेत दर शनिवारी शेंदूर लावून आम्ही सगळे हनुमान स्तोत्र म्हणायचो..
तालीम मास्तर खड्या आवाजात “भीमरूपी महारुद्रा” सुरु करायचे..
खोब-याच्या आशेनं आम्ही उभे असायचो..
त्यात एका ठिकाणी “हे धरा पंधरा श्लोकी लाभली शोभली बरी..” अशी ओळ यायची..
मला एकदम वाटायचं की श्लोक संपले आणि मास्तर काहीतरी “हे धर” म्हणून सांगताहेत..म्हणून एकदा मी “धरायला” पुढेही झालो होतो..
पुढे हायस्कूल सुरु झालं..बरंच काही नीट समजायला लागलं..जमिनीवर टाकून बसायची बस्करं गेली आणि लाकडी बेंच आली..
मग चुपचाप समोरच्या डेस्कात कर्कटकानं खोदखोदून आरपार भोकं पाडण्याची वर्षं सुरु झाली..
मज्जा..!!
लेखक : नचिकेत गद्रे
कुठेतरी छानसे वाचलेले ………
प्रेमाची निशाणी ???
जरूर वाचा….
आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे कि ताजमहाल प्रेमाची निशाणी म्हणून ओळखला जातो…….
पण काही इतर गोष्टी जे फार कमी लोक जाणतात त्या ह्या अश्या————
१) मुमताज हि शहाजहानची ४ थी बायको होती.
२) मुमताजशी लग्न करता याव म्हणून शहाजहानने तिच्या नवऱ्याचा खून केला.
३) मुमताज तिच्या १४ व्या बाळंतपनात मेली.
४) त्या नंतर शहाजहानने तिच्या बहिणीशी लग्न केल.
.
.
.
अरे मला सांगा यात काय घंटा प्रेम आल ??????????????
कुठेतरी छानसे वाचलेले ………
संस्कृती
शेवटी संस्कृती म्हणजे बाजरीची भाकरी…
वांग्याचे भरीत..
गणपतीबाप्पा मोरया ची मुक्त आरोळी.
केळीच्या पानातली भाताची मूद आणी त्यावारचे वरण.
उघड्या पायांनी तुडवलेला पंचगंगेचा काठ…
मारूतीच्या देवळात एका दमात फोडलेल्या नारळातली उडालेले पाणी…
दुस-याचा पाय चूकुन लागल्यावर देखील आपण प्रथम केलेला नमस्कार..
दिव्या दिव्यादिपत्कार…
आजीने सांगितलेल्या भुतांच्या गोष्टी…
मारुतीची न जळणारी आणि वाटेल तेव्हा लहानमोठी होणारी शेपटी…
दस-याला वाटायची आपट्याची पाने…
पंढरपुरचे धुळ आणि अबिर यांच्या समप्रमाणात मिसळून खाल्लेले डाळे आणि साखरफुटाणे…
सिंहगडावर भरुन आलेली छाती आणी दिवंगत आप्त्यांच्या मुठभर अस्थींचा गंगार्पणाच्या वेळी झालेला स्पर्श…
कुंभाराच्या चाकावर फिरणा-या गोळ्याला त्याचे पाण्याने भिजलेले नाजुक हात लागून घाटादार मडके घडावे तसा ह्या अद्र्श्य पण भावनेने भिजलेल्या हांतानी हा पिंड घडत असतो.
कुणाला देशी मडक्याचा आकार येतो.
कुणाला विदेशी कपबशीचा….
पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे……
कुठेतरी छानसे वाचलेले ………
क्षणभंगुर
१० :१५ ची CST लोकल
ट्रेन सुटली ..धावता धावताच तो चढला .. धावत पळत.. कसा बसा गर्दीतून तो आत शिरला.. आत मध्ये येताच क्षणी त्याची नजर पुढच्या दरवाज्या जवळ… तो पूर्णपणे कावरा बावरा.. बहुतेक त्याची नजर तिलाच शोधात असावी.. बराच वेळ..त्याने पाहिलं .. पुढच्या दोन्ही दरवाज्यांजवळ येऊन पाहिलं.. त्याच्या नजरेत..एक भीती.. एक हुरहूर.. तिच्याबद्दलची काळजी.. दिसत होती.. त्याने गर्दीतून शेवटी वाट काढत पुढच्या दरवाज्याजवळ येऊन परत खात्री केली.. रुमाल काढून घाम पुसला..लगेच काहीतरी आठवल्यासारख त्याने ..आपला मोबाईल फोन बाहेर काढला.. मोबाईल मध्ये नंबर शोधून..लगेच फोन केला.. नुसताच हेलो हेलो ऐकू आलं ..तिकडून काहीच आवाज येत नसावा.. त्याने पुन्हा प्रयत्न केला.. पण मात्र नाईलाज.. शेवटी त्याने.. शांत राहण्याचा निर्णय घेतला..! पण..शांत राहून सुद्धा..तो इकडे तिकडे पाहत होता..कि ती कुठे बसली तर नाहीये ना..!
खर तर.. त्याची ही रोजची सवय झाली होती.. रोज स्टेशन वर त्याने तिची वाट पाहणे.. तिचे ट्रेन मध्ये चढणे..त्याचे तिला पाहणे.. रोजचा एकत्र ट्रेन मधला प्रवास..! गर्दीतून… त्याने तिला दिलेलं स्मितहास्य..अन त्यावर..तिने ही दिलेला प्रतिसाद.. असं दोघांच ..प्रेम वाढत गेलं.. प्रेमाच्या बंधनात दोघे अडकले.. जसा रोजचा प्रवास तसा आयुष्याचा प्रवास सुद्धा एकत्र करण्याचं त्यांनी ठरवलं .. पण नियतीला ते मान्य नव्हतं..घडू नये तसचं घडलं..
एके दिवशी अचानक….ट्रेन मध्ये आरडा ओरडा…. बायकांच्या किंकाळ्या.. माणसांची गडबड.. ट्रेन थांबवण्यासाठीची लोकांची धडपड.. सारे वातावरण भयानक.. “कोणी चैन खेचा चैन खेचा..मुलगी पडली ” अश्या हाका. ट्रेन मधले लोकं उठून बाहेर पाहायला लागले.. ट्रेन थांबली.. पण … ट्रेन थांबण्या आधीच ..सार संपलं होतं… तीच मुलगी ट्रेन मध्ये चढताना.. पाय घसरून पडली होती.. तिचे शरीर ट्रेन आणि प्लाटफोर्म मधल्या अंतरात अडकलं होतं.. काही समजण्याच्या आधीच.. तीच आयुष्य संपलं होतं.. त्याच्या नजरे समोर ती त्याला कायमची सोडून गेली होती.. सार निःश्ब्ध.. हृदयाचे ठोके चुकले…या परिस्थितीत काय करावं..त्याला काहीच कळत नव्हतं.. जमलेल्या लोकांनी आणि पोलिसांनी.. राहिलेल्या गोष्टींची जबाबदारी घेतली..पण त्याचं मन आतून पूर्णपणे ढासाळून गेलं होतं…नुसतं स्तब्ध होऊन तो तिच्या कडे पाहत राहिला …. मगाशीच आल्या आल्या तिने मारलेल्या गप्पा.. त्यांनी एकत्र घालवलेले सारे क्षण आठवायला लागले… आपलं माणूस आपल्याला कायमचं सोडून गेल्यावर त्याची झालेली दयनीय अवस्था पाहून.. डोळ्यात आसवांनी आपोआप वाट धरली होती… आयुष्य हे किती क्षणभंगुर असतं.. ह्याचा अनुभव फार जवळून त्याला जाणवला.. त्याच जागी तो ..एकटाच रडत बसला. .
आज पण तो रोज तिची वाट पाहतो.. तिकडेच.. त्याचं जागी.. १०:१५ ची CST पकडतो.. लोकल मध्ये चढल्यावर…असाच काहीसा तिला तो रोज शोधत राहतो..अन…नंतर परत.. सार आठवून . भरगच्च डोळ्यांनी निस्तब्ध अश्रू गाळत शांत बसतो..
आयुष्य हे क्षणभंगुर आहे.. आपल्या वर प्रेम करणारे आपली काळजी करणारे बरेच लोकं असतात.. आपण नसण्याने त्यांच्या आयुष्यात काय घडू शकत याचा विचार करा.. घाई.. ऑफीस… सगळ्यांच्याच नशिबी असतं..पण जीवन हे अमूल्य असतं.. ह्याचा विचार करा..अन आजपासून..जपून प्रवास करा..
कुठेतरी छानसे वाचलेले ………
लोकमान्य टिळक
लोकमान्य टिळक………….
भारतीय जनतेत ‘स्व’राज्याची व राष्ट्रवादाची जाणीव निर्माण करणारे; तसेच ते स्वराज्य मिळवण्याची सिंहगर्जना करून समाजाला प्रेरित करणारे राष्ट्रीय नेतृत्व !
स्वातंत्र्यपूर्व काळातील महाराष्ट्रातील विलक्षण तेजस्वी आणि तर्डेंदार व्यक्तिमत्त्व म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. १८५६ चा रत्नागिरीतल्या चिखलगावचा त्यांचा जन्म आणि १९२० चा मृत्यू. या कालावधीतील बाळ ते लोकमान्य असा त्यांचा प्रवास भारताला नवचैतन्य देऊन गेला.
टिळकांचे मूळ नाव केशव असले, तरी लोकव्यवहारात त्यांचे बाळ हे टोपणनावच रूढ झाले. त्यांच्या शालेय जीवनातली शेंगांच्या टर्रेंलाची घटना, गणित फळ्यावर लिहून हात खराब करून घेण्यापेक्षा गणिते तोंडी सोडवण्याचा उपाय, संत हा शब्द सन्त, संत किंव सन्त अशा तीन पद्धतीनं लिहिला तर बिघडते कुठे असा शिक्षकांना केलेला खडा सवाल-या सगळ्या घटनांमुळे टिळक हुशार, बुद्धिमान पण काहीसे हट्टी विद्यार्थी अशा सदरात मोडले जात.
’स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच’ अशी प्रतिज्ञा प्रचंड आत्मविश्र्वासानं करणारी टिळकांसारखी व्यक्ती एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व म्हणूनच घडत गेली. कॉलेजमध्ये विद्येबरोबरच शरीरसंपत्ती मिळवण्यात त्यांना जास्त रस होता. यामुळेच कदाचित पुढचे शारीरिक, मानसिक कष्ट ते सोसू शकले. १८७६ ला बी.ए., पुढे गणितात एम. ए., व नंतर एल. एल. बी. अशी उत्तम शैक्षणिक कारकीर्द असलेले टिळक.
लोकमान्यांनी १८८० साली विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि आगरकरांसमवेत सुरू केलेले न्यू इंग्लिश स्कूल, आर्यभूषण नावाने सुरू केलेला छापखाना, ‘केसरी आणि मराठा’ सारख्या वृत्तपत्रांची सुरुवात, डेक्कन एज्युकेशन सोसायटीची व फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना- या सगळ्याच घटनांमुळे अवघा महाराष्ट्र घडत गेला.
’पारतंत्र्यामुळं आमच्या लोकांची स्थितीच अशी झाली आहे की, राजकीय बाबतीत सुधारणा झाल्याखेरीज, स्वातंत्र्य मिळाल्याखेरीज आमची सामाजिक स्थिती सुधारावयाचीच नाही,’ अशी ठाम भूमिका लोकमान्यांची पर्यायानं केसरीची होती. नेमकी याविरुद्ध भूमिका आगरकरांची होती. त्यांच्या मते आधी सामाजिक सुधारणाच होणे गरजेचे होते. यामुळे केसरीतच नव्हे तर अवघ्या देशात वैचारिक संघर्ष सुरू झाला. याची परिणीती आगरकरांनी केसरी सोडण्यात झाली.
केसरीतून (मराठी) आणि मराठातून (इंग्रजी) होणारे लोकमान्य टिळकांचे लेखन स्फूर्तिदायी आणि दिशादर्शक होते. केसरीतून वेळोवेळी प्रसिद्ध होणारे अग्रलेख जनसामान्यांना सामाजिक, राजकीय परिस्थितीबाबत सजग करत राहिले. ’मराठा’सारखे इंग्रजी वृत्तपत्र सुरू करण्यामागे-जो विचार केसरीतून पोहोचवला जातो, तोच इंग्रजांपर्यंत आणि परप्रांतीय हिंदी लोकांपर्यंत जावा-ही भूमिका होती. रँडच्या खुनानंतर ’सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?’ या केसरीतल्या अग्रलेखामुळे महाराष्ट्र खडबडून जागा झाला. स्वदेशी चळवळीबाबतचा ’गूळ का साखर’ हा लेख, ‘राष्ट्रीय मनोवृत्ती ज्यातून निर्माण होईल, ते राष्ट्रीय शिक्षण’ अशी केलेली व्यापक व्याख्या, त्यावर लिहिलेले लेख- या सगळ्यांतून समाज प्रगल्भ होत गेला. त्यांच्या जहाल लेखनाचा प्रभाव क्रांतिकारकांवरही पडला. टिळकांच्या विचारांच्या प्रभावातून स्वातंत्र्यवीर सावरकर, न. चि. केळकर, कॉम्रेड डांगे यांसारखी व्यक्तिमत्त्वे घडली.
लोकमान्यांच्या लेखनात बनावट, सजावट, अलंकाराची वेलबुट्टी नसायची, तर ते लेखन रोख-ठोक आणि अभ्यासपूर्ण असायचे. १९०० मध्ये प्रो. मॅक्सम्यूलर यांच्यावरचा त्यांचा अग्रलेख प्रसिद्ध झाला. जर विद्वान मनुष्य असेल, मग तो विलायती असला, तरी त्याचे गुण घ्यावेत ही त्यामागची भावना होती. लेखनाप्रमाणेच लोकमान्यांचे वक्तृत्वही धारदार होते. सामाजिक सहभागाचे महत्त्व जाणणारे ते विलक्षण प्रभावी संघटक होते. समाज एकजूट होण्यासाठी त्यांनी सार्वजनिक शिवजयंती आणि गणेशोत्सवाचा श्रीगणेशा महाराष्ट्रात केला. या उत्सवांची सुरुवात हे खरे तर त्यांच्या असंख्य ‘संघटनात्मक’ कामांपैकी एक काम. पण या एकाच कार्यातून त्यांच्यामधल्या अतिकुशल संघटकाची व द्रष्ट्याची जाणीव आपल्याला होते.
१९०६ साली सुरू झालेल्या वंगभंग चळवळीत लोकमान्य टिळकांचा मोठा सहभाग होता. मराठी व बंगाली लोकांनी एकत्र येऊन राष्ट्रीय एकात्मतेची ज्योत पेटवावी हा विचार घेऊन त्यांनी राष्ट्रवादाचा पुरस्कार केला. कर्झनशाही विरुद्धची टीका, राष्ट्रीय सभेच्या कामासाठी लाल-बाल-पाल अशी एकत्र आलेली त्रयी, खामगाव-वर्धा-नागपूर-सोलापूर-मुंबई-मद्रास-कोलंबो असा टिळकांचा मोठा दौरा, कॉंग्रेस अधिवेशनातील अध्यक्षस्थान, होमरूल लीगची स्थापना, जहाल लेखांमुळे देशद्रोहाचे झालेले आरोप, तुरुंगवासाची शिक्षा या सगळ्यांमुळे लोकमान्यांची प्रतिमा उजळत गेली आणि त्यांची लोकप्रियता संपूर्ण भारतात वाढत गेली. स्वदेशी, स्वराज्य, राष्ट्रीय शिक्षण व बहिष्कार या चतु:सूत्रीच्या साहाय्याने त्यांनी ब्रिटिशविरोधी वातावरण निर्माण केले व भारतीय जनतेत संघर्षाची भावना निर्माण केली. ब्रह्मदेशातील मंडाले येथील तुरुंगात, अतिशय प्रतिकूल अशा हवामानात तब्बल ६ वर्षांची (१९०८-१९१४) शिक्षा भोगून परत आल्यानंतरही त्यांनी तेवढ्याच तडफेने कार्याला सुरुवात केली. राष्ट्रीय भावनेच्या विस्तारासह कॉंग्रेसच्या संघटनात्मक विस्तारातही त्यांचा शब्दश: ‘सिंहाचा’ वाटा होता. म्हणूनच त्यांचे कार्य म्हणजे केवळ ‘टिळक यांची कारकीर्द’ नसून, ते भारताला स्वातंत्र्याच्या, स्वराज्याच्या जवळ नेणारे ‘लोकमान्य टिळक युग’ होते.
अशा या लोकप्रिय व्यक्तीची सर्वात प्रिय जागा कुठली असेल, तर ती म्हणजे पुण्याजवळचा सिंहगड. एकांताची व चिंतनाची भूक लागली असता खराखुरा एकांतवास ते सिंहगडावरच अनुभवायचे. तेथेच मनन, चिंतन आणि लेखनही करायचे. लोकमान्यांनी जे ग्रंथ लिहिले, त्या प्रत्येकात एकेक गुणविशेष आहे. ’ओरायन’ मध्ये गणिती आणि ज्योतिषविषयक ज्ञान आहे. ’आर्यांचे वसतिस्थान’ मधून संशोधन व विश्र्लेषण दिसते, आणि मंडालेच्या तुरुंगवासात लिहिलेल्या ‘गीतारहस्यात’ सखोल तात्त्विक विचार वाचायला मिळतो.
लोकमान्यांच्या व्यक्तिमत्त्वाची, लेखणीची व वक्तृत्वाची धार हिंदुस्थानभर पोहोचली. केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहिलेली त्यांची प्रतिमा प्रत्येक देशभक्ताला ताकद देत राहिली. जनतेने त्यांना ’लोकमान्य’ केले. त्याचबरोबर ते हिंदुस्थानातील (ब्रिटिशविरोधी) अस्वस्थतेचे जनक मानले गेले. खरे तर राष्ट्राचा अभ्युदय व्हायचा, तर ते राष्ट्र नेहमी अस्वस्थच असायला हवे हे लोकमान्य टिळकांनी केव्हाच जाणले होते. याच सकारात्मक अस्वस्थतेचा साक्षात्कार आपल्याला त्यांच्या जीवनकार्यातून होतो.
मराठी भाषा
आपल्या मराठी भाषे विषयी थोडक्यात….. मराठी ही इंडो-युरोपीय भाषा कुलातील एक भाषा आहे.
भारतातील प्रमुख २२ भाषांपैकी मराठी एकआहे. महाराष्ट्र
आणि गोवा ह्या राज्यांची मराठी ही अधिकृत राजभाषा आहे.
मराठी प्रथम भाषा (मातृभाषा) असणार्यांच्या लोकसंख्येनुसार
मराठीही जगातील पंधरावी व भारतातील चौथी भाषा आहे.
मराठी भाषेची निर्मिती संस्कृत पासून महाराष्ट्री प्राकृत व अपभ्रंश या भाषांपासून झाली आहे.
मराठीभाषी प्रदेश -
मराठी भाषा भारतासह मॉरिशस व इस्रायल
या देशांतही बोलली जाते. त्याचबरोबर जगभरात
विखुरलेल्या मराठी-भाषकांमुळ े मराठी अमेरिकेची संयुक्त
संस्थाने, संयुक्त अरब अमिरात, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, सिंगापूर, जर्मनी, युनायटेड किंग्डम,
ऑस्ट्रेलिया व न्यू झीलंड येथेही बोलली जाते.
भारतात, मराठी मुख्यत्वे महाराष्ट्र राज्यात बोलली जाते.
त्याचबरोबर गोवा, कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश, मध्य प्रदेश,
तमिळनाडू व छत्तीसगढ राज्यांत आणि दमण आणि दीव,
दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांतील काही भागात मराठी बोलली जाते. मराठी भाषक
मोठ्या प्रमाणात असलेले भाग- बडोदा, सुरत, दक्षिण गुजरात
व अहमदावाद (गुजरात राज्य), बेळगांव, हुबळी-धारवाड, गुलबर्गा,
बिदर, उत्तर कर्नाटक (कर्नाटक राज्य), हैदराबाद (आंध्र
प्रदेश), इंदूर, ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) व तंजावर (तमिळनाडू)
राजभाषा – भारताच्या राज्यघटनेतील २२ अधिकृत भारतीय
भाषांच्या यादीत मराठीचा समावेश आहे. मराठी ही महाराष्ट्र
राज्याची एकमेव अधिकृत राजभाषा आहे. गोवा राज्यात
कायद्यानुसार कोकणी ही राजभाषा असली तरी मराठीचा वापर
शासनाच्या सर्व व कोणत्याही कारणासाठी होऊ शकतो.
शासनाशी मराठीत होणाऱ्या पत्रव्यवहाराचे उत्तर मराठीतच दिले जाते.४२वा अहवाल- जुलै २००३-०४ pp. para 11.3</
ref>, दादरा व नगर हवेली याकेंदशासित प्रदेशात
मराठी एक अधिकृत राजभाषा आहे.
महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठात मराठीच्या उच्च
शिक्षणाची सोय आहे तसेच महाराष्ट्राबाहे रील
गोवा विद्यापीठ (पणजी), महाराजा सयाजीराव विद्यापीठ (बडोदे), उस्मानिया विद्यापीठ (आंध्र
प्रदेश), गुलबर्गा विद्यापीठ,
देवी अहिल्या विद्यापीठ (इंदूर) व जवाहरलाल नेहरू
विश्वविद्यालय (नवी दिल्ली) येथे
ही मराठीच्या उच्च शिक्षणासाठीचे विभाग आहेत.





